‘तुमचा महाराष्ट्राशी काय संबंध?’; मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
"अरे संपवून टाकलं तुम्हाला. तुम्हाला कळलंच नाही की कधी तुमच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली. अजून पालघरचा उमेदवार जाहीर करु शकत नाहीयत. मिंधे स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करु शकत नाहीयत", अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर केली.
“शिवसेना नकली असायला ती तुमची डिग्री आहे का?”, असा खोचक सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं होतं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नकली शिवसेना म्हणत ठाकरे गटाला हिणवलं होतं. या दोन्ही नेत्यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये आज सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
“आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. कोण गद्दार आणि कोण मालक हे तुम्हाला माहिती आहे. सरळ उघड सांगतो. कारण परवा मी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं की, यापुढे मी जी टीका करणार आहे ती देशाचे पंतप्रधानांवर नाही तर भाजपच्या नरेंद्र मोदींवर करणार आहे. मी देशाच्या पंतप्रधानांचा कधीच अपमान करणार नाही. एकतर तुमचा महाराष्ट्राशी काय संबंध? तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
ठाकरेंचं अमित शाह यांनाही प्रत्युत्तर
“शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांसाठी शिवसेना स्थापन केली, शिवसेनेला जन्म दिला. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले. खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शाह आले. ते बोलून गेले, शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय, काय भा*** जनता पक्ष आहे, भेकड आहे. मी नुसतं काहीही बोलतोय म्हणून बोलत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सची बंदूक त्यांच्या डोक्यावर लावली आणि घेऊन गेले. इथूनच ते पालघरमधून सुरतला घेऊन गेले”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
‘दिल्लीतला फोन आला तर मिंधेंची दाढी सचळाचळा कापते’
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणून कांगावा केला जातो. पण त्यांचे विचार नेमके कोण ऐकतंय? मिंधे माईकवर जे काही कुंतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. अरे शिवसेनेचा दरारा काय आहे, एक फोन बाळासाहेबांनी केला तर दिल्लीतील लोकं चळाचळा कापायचे. आता दिल्लीतला फोन आला तर मिंधेंची दाढी सचळाचळा कापते. हे शिवसेनेचे विचार?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. “अरे संपवून टाकलं तुम्हाला. तुम्हाला कळलंच नाही की कधी तुमच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली. अजून पालघरचा उमेदवार जाहीर करु शकत नाहीयत. मिंधे स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करु शकत नाहीयत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर केली.