पुन्हा NDA सोबत जायचं का? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना प्रश्न
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे आज पार पडला. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचेच लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच २०२४ ते २०२७ यावर्षीच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात आला.
शिवसेनेचा आज 58 वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचा आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एनडीएसोबत जायचं का? असा उपरोधिक प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. “माझी परिस्थिती ही शेवटचा जो बोलतो, बॅटिंग करायची अशी आहे. मग बॉल कसा मारायचा. मारायचा छकडा नाही तर लकडा. पण लकडा कधी मारणार नाही. छकडाच मारेल. माझं कौतुक केलं आहे. माझ्यामुळे यश मिळालं असं तुम्ही म्हटलं. पण यशाचे मानकरी मी नाही,. तुम्ही आहात. आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास असेल तर जगात कुठेही जा मरण नाही, असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. पण आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. मोदींमध्ये अहंकार आहे. भाजपला तडाखा बसला आहे. तडाखा बसल्यावर बाजूच्या गल्लीत कसं जायचं विषयांतर कसं जायचं हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा केली. जायचं? ज्या नालायकाने आपली शिवसेना फोडली. त्या नालायकांसोबत जायचं?”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
“तुम्ही तुमचं बघाना. आमचं काय बघता. तुमची फाटली. माझी पंचाईत काय होते. घराणेशाही म्हटल्यावर घराची भाषा येते. तुम्ही माझ्यावर सभ्यतेचा शिक्का मारला. त्यामुळे समानार्थी शब्द शोधतो. फाटली या शब्दाला समानार्थी शब्द मिळत नाही. फाटले ते फाटले. भुजबळ शिवसेनेत येणार अशी पुडी सोडली. तुमच्याशी भुजबळ बोलले का. माझ्याशी बोलले का . मी त्यांच्याशी बोललो का, मग कशाला उचापती करता?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.
‘हे सरकार चालेल असं वाटत नाही’
“मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदार होईल. हे सरकार चालेल असं वाटत नाही. चालू नये असंच वाटतं. सरकार चालेल का पडेल का नाही. पडलेच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापनक करू”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.
“शिवसेनेला मुस्लिम मते मिळाली. सर्व देशभक्तांची मते मिळाली. सर्व देशभक्तांची मते मिळाली आहे. आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार. ते डोमकावळे तिकडे बसलेत. डोमकावळे म्हटल्यावर पिंडदान आलं. त्यांची कावकाव सुरू आहे. मी हिंदुत्व सोडलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला देशभक्तांनी मतदान केलंय. मी हिंदुत्व सोडलंय मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं वाटत असेल तर मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असा दावा आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“काही क्षण असे येतात की भावना व्यक्त करणं कठिण होतं. लोकसभा निवडणुकीनंतर आपला शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम आहे. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची पीसी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्वच होते. ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आशीर्वाद दिलं. त्यात दलित मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन आले शीखही आले. सर्वांना धन्यवाद देतो”, अशीदेखील भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.