‘प्रकाश आंबेडकर-आमचं एकच वैचारिक व्यासपीठ’, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ योग आज घडून आलेला बघायला मिळाला. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आज एकाच मंचावर एकत्र आले.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ योग आज घडून आलेला बघायला मिळाला. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आज एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची आठवण काढली. रामदास आठवले यांच्यासोबत एकत्र आलो होतो, आता प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपली एकाच मंचावर भेट झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
“काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू आहेत, असं म्हटलं होतं. तेव्हा मी त्याला एकत्र ये असं म्हटलं होतं”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“आज मला आनंद आणि अभिमान आहे, असं काही नाही की प्रकाशजी आणि माझी ओळख नाही. आम्ही एकमेकांना ओळखतो. मध्यंतरी आमच्या भेटीही झाल्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“त्यांना भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा, त्याला मिनिटांचं गणित लागत नाही. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमचं दोघांचं एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत”, असं ठाकरे म्हणाले.
“प्रकाश जी आपण धर्माचं भांडण सांगितलं, धर्मातल्या धर्मात जे भांडण होतं ते म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यामुळे भांडण होतं. माणूसच आहे. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“सांगायचं झालं, तुम्ही मनुस्मृतीचा ओझरता उल्लेख केला. चातुरवर्णचा आला. डोंक म्हणजे ब्राह्मण, हात म्हणजे क्षत्रिय, पोट म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शुद्र. हा विषय एकदा बाळासाहेबांसमोर आला होता. चातुरवर्ण म्हणजे काय रे, आरोग्यसाठी जेव्हा डॉक्टर शिर्षासन करायला सांगतात तेव्हा पाय कुठे जातात, डोकं कुठे येतं, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही चांगल्या कार्यासाठी आपण घराबाहेर निघताना आपण वडिलधाऱ्यांचे पाय का पडतो? ही शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे. तेच आमचं हिंदुत्व आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
“वेळ आलेली आहे. पुढे कोण जाणार? मारल्या ना या दोघांनी उड्या. बाबासाहेब हताश बसले असते तर काय झालं असतं? बाबासाहेबांनी अत्याचार भोगला, माझ्या आजोबांनी पाहिला, ते उभे राहिले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना टोला
“हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे? आपला देश विचित्र चाललेला आहे. आदर्श कोणी कुणाला मानायचा हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. कारण लोकशाही आहे. दोन नातू बोलत आहेत. काल आजोबा बोलायला लागले आहेत. त्यांचे नातू काय करतील माहिती नाही. पण वाट दाखवणारे आदर्श मानायचे की वाट लावणारे आदर्श मानायचे? हा मोठा प्रश्न आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला लगावला.
“आज आपण ज्या दिशेला चाललो आहोत ते जर बघितलं तर नक्कीच आपण हुकूमाशाहीच्या दिशेला चाललो आहोत, याबद्दल कुणाच्याही मनात शंका राहण्याचं कारण नाही. एक बुर्खा घातला गेलाय. कारण स्वत:चा चेहरा दाखवला तर लोकं जवळ येणार नाहीत. तो मुखवटा घालायचा, मतं मिळवायची आणि राज्य करायची. इंग्रजांची जी तोडा-फोडा आणि राज्य करा, अशी नीती होती तीच नीती अवलंबली जातेय. जातीपातीच्या भींती उभ्या करायच्या आणि राज्य सरायचं. आता आमचा एक शाखाप्रमुख बसलाय. त्याला विचारलं का कोणत्या जातीचा आहे? कुणालाच बाळासाहेबांनी कोणत्या जातीचाय ते विचारलं नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हल्लीच्या दिवसांत गोमांस सापडलं म्हणून मॉब लिंचिंग होते. माणसांना मारलं जातं. पण त्याचवेळेला एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्या डोळ्यादेखत तिच्या मुलीला मारल्यानंतर त्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करुन त्यांना सोडलं जातं, त्यांना उमेदवारी दिली जाते, हे आमचं हिंदुत्व नाही. इकडे आम्ही जात-पात धर्म मानत नाहीत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.