‘चंद्रचूड हुकूमशाहीला चूड लावतील’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय विधीमंडळ नाकारु शकतं का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. त्यांच्या त्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात प्रतिक्रिया दिली.
मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. अवतरणार्थ पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला जातो त्यावर त्यांनी भाष्य केलं. “काही जण म्हणतात की, तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचं हिदुत्व मानतात. पण तसं नाही. प्रबोधनकार ठाकरेंचं, माझे वडील बाळासाहेब ठाकरेंचं, माझं आणि आदित्य आमचं सर्वांचं हिंदुत्व हे एकच आहे. यात कुठेही कानामात्रा झालेला नाही. कारण मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय हे मूळ वाक्य माझं नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे. आम्हाला शेंडी, जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही हे माझं वाक्य नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. त्यांना हे बाळकडू प्रबोधनकारांकडून मिळालं. प्रबोधनकारांना त्यांच्या वाडवडिलांकडून मिळालं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोरोना काळात आज जसं मी काय काम केलं? मला जे शक्य होतं ते मी केलं. पण प्रबोधनकारांचे जे वडील होते सीताराम ठाकरे यांच्याबद्दल आणखी किती जणांना माहिती आहे? जशी कोरोनाची साथ आली, तशी त्यावेळी प्लेगची साथ आली. प्लेगची साथ एवढी भयानक होती की लागला की गेला. आता जशी परिस्थिती होती, मला आठवतंय की, कोरोनाची सुरुवात झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केला तेव्हा हाहाकार माजला होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘हा आमच्या घराणेशाहीचा वारसा’
“सगळे रस्त्यावर उतरले होते. मी त्यांना त्यावेळी फोन केला. पंतप्रधानजी असा असा प्रोब्लेम आहे. त्यामुळे मला काही जीवनाश्मक गोष्टी चालू ठेवाव्या लागतील. याबाबत मी फेसबुक लाईव्ह करुन जाहीर करतो. ते म्हणाले आवश्य कर. पण फ्रान्स, इटली इकडे प्रेत व्हायला जागा नाहीय. तशीच परिस्थिती त्या काळात पनवेल गावात होती. प्लेगनी जी लोकं निधन पावत होती त्यांची शव वाहून नेण्यासाठी कोणी पुढे यायला तयार नव्हतं. त्यावेळी माझ्या आजोबांचे वडील आणि त्यांचे वडील पुढे आले. ते करता करता त्यांनाही प्लेग झाला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं. हा आमच्या घराणेशाहीचा वारसा आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
‘तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही’
“मी दसऱ्याच्या सभेत जे बोललो, घराणेशाहीच्या बद्दल जे काही बोललं जातं, जरुर बोला. मी घराणेशाहीतला आहेच ना, त्यावर मी काय करु शकतो? नशिब अजून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे हे नाव त्याला नाही दिलं. कारण सांगता येत नाही. एक दिवस असं होईल की, आजपासून तुझं नाव हे आणि त्याचं नाव उद्धव ठाकरे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “कुणालाही कुणाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. वडील बदलण्याचा अधिकार नाही. अजिबात नाही. निवडणूक आयोगाला नाहीच नाही. निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे देऊ शकतं. पण माझ्या पक्षाचं नाव कुणाला देऊ शकत नाही. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तो आम्ही मानणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“घराणेशाहीवर बोलताना तुम्ही स्वीकारलं तर आम्ही मानतो. नाही म्हणालात तर नाही. तुम्ही सांगितलं की, घरी बस. आज कुणीतरी म्हणालं की, यांना घरी बसून काम करण्याची सवय होती वगैरे, अरे खाल्ल्या घरची… जाऊदे मला त्यावर बोलायचं नाही. पण अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये”, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे सरन्यायाधीशांबद्दल काय म्हणाले?
“सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल मी बोललो. त्यांचे वडील सरन्यायाधीश होते. ते सरन्यायाधीश होते. त्यांचे पुत्र हे वकील आहेत. ते त्यांच्या कर्तृत्वाने आहेत. घराण्याची पंरपरा असते. ज्यावेळेला चंद्रचूड काल-परवा बोलले, आपल्याकडे दोन व्यवस्था आहेत. आम्ही म्हणजे ते न्यायव्यवस्था ही तशी जनतेला थेट बांधील नाही कारण आम्ही तुमच्यातून निवडून येत नाही. आम्ही दिलेला निर्णय विधीमंडळ नाकारु शकत नाही. तुम्हाला तो निर्णय चुकीचा वाटला तर तुम्ही तिकडे कायदा बदला. तो अधिकार तुम्हाला आहे. पण कायदा न बदलता तुम्ही निर्णय मानणार नाही, असं होऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“आम्ही जनतेला बांधील नाहीत असं वक्तव्य निस्वार्थी व्यक्तीच बोलू शकते. कारण निवडून आलेल्यांकडून माझी कारकीर्द संपल्यानंतर मला राज्यपाल व्हायचं असेल किंवा राज्यपाल व्हायचं असेल तर ही अपेक्षा करता येणारच नाही. सुदैवाने आज तरी सर्वोच्च न्यायालय एका न्यायाने चाललंय, हा एक मला आशेचा किरण दिसतोय. चंद्रचूड हे या हुकूमशाहीला चूड लावतील ही मला खात्री आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.