मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. पण तरीही ‘सामना’ वृत्तपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका का केली जाते? असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. विशेष म्हणजे शरद पवार बाजूला बसलेले असताना उद्धव ठाकरे यांना त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे यावर प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांची आज पत्रकार परिषद पार पडली. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांना ‘सामना’तून शरद पवार आणि अजित पवारांवर टीका का केली जाते? असा रोखठोक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं.
“आमचं वैशिष्ट आहे, आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. भाजपसोबत असताना भाजपवर टीका करायचो”, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे याबाबतचं वक्तव्य केल्यानंतर जोरजोरात हसू लागले. त्यानंतर बाजूला बसलेले शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.”तुम्ही तुमच्या मीडियातून टीका केली म्हणून आम्ही आमचं काम करायचं थांबवायचं का? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो”, असं शरद पवार म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हो, बरोबर, उद्या जातो, शपथ घेतो”, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचा संयोजक कुणाला ठरविण्यात येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन दिवसांनी बैठक पूर्ण झाल्यावर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.