कोणतेही गुन्हे माफ करता येत नाही, राज्यपालांविरोधात खटला भरलाच पाहिजे : उद्धव ठाकरे
ही बेबंदशाही जी सुरुय ती आता थांबायलाच हवी. हिंदुस्थान आणि हिंदुत्व म्हटल्यावर एक नैतिकता आहे. ती सगळ्यानी टिकवायला हवी. जर विधानसभा अध्यक्षांनी काही चुकीचा निर्णय दिला तर पुन्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मला त्यावेळी जे योग्य वाटलं तेच मी केलं. असं माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं. कोश्यारी यांच्या या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मला वाटलं त्यावेळी म्हणून मी हत्या केली असं म्हणून चालत नाही. हत्या ही हत्याच असते. ती केव्हाही केली तरी तो गुन्हाच असतो. त्यामुळे कोणताही गुन्हा माफ करता येत नाही. त्यानुसारच भगतसिंह कोश्यारी यांनी अक्षम्य चूक केली आहे. बेकायदेशीर सरकार बसवून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यपालांविरोधात खटला भरलाच पाहिजे. त्यांच्यावर फसवणुकीचा खटला भरला गेलाच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. राज्यपालांची कृती बेकायदेशीर आहे. त्यात अध्यक्षांची निवडही कायदेशीर की बेकायदेशीर आहे हे पाहावं लागेल. घटनांच्या मालिकेतील एक घटना म्हणजे अध्यक्षही बेकायदेशीर होता. राज्यपाल ही संस्था बरखास्त करावी. ही वरून लादलेली लोक नकोत, ही शोभेची पदं नाहीत तर उपद्व्यापी पदं आहेत. राज्यपाल नियुक्तीसाठी कॉलेजियम असावं. नियमावली असावी. संघाचे कार्यकर्ते राज्यपाल होत असतील तर कारभाराला काहीच अर्थ नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपाल जर घरगड्यासारखं काम करत असेल तर अशा संस्था बरखास्त करा. जोपर्यंत नियमावली होत नाही तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.
बेबंदशाही थांबली पाहिजे
जसा मी राजीनामा दिला तस यांनीही आता नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आता शेवटचं न्यायालय जनता आहे. जनतेच न्यायालय ठरवेल काय करायचं ते. अनिल परब आणि अनिल देसाई आहेत. ज्यांनी ही लढाई सुरू असताना दिल्लीची सूत्रं हातात घेतली होती. वकिलांशी चांगला संवाद ठेवला होता. ही बेबंदशाही जी सुरुय ती आता थांबायलाच हवी. हिंदुस्थान आणि हिंदुत्व म्हटल्यावर एक नैतिकता आहे. ती सगळ्यानी टिकवायला हवी. जर विधानसभा अध्यक्षांनी काही चुकीचा निर्णय दिला तर पुन्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अध्यक्ष जातील
ज्या दिवशी अपात्रतेसंदर्भातला निर्णय होईल त्यावेळी अध्यक्ष आपोआप जातील. कारण याच 40 जणांच मतदान घेऊन ते निवडून आले, तेच अपात्र झाले तर अध्यक्ष हेही जातील. आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती असं वेगळं नाही. इथेच सगळ्यांची गल्लत होतेय. अपात्रतेसंदर्भात ज्यादिवशी नोटीस झाली त्यावेळेनुसारच अध्यक्ष यांनी निर्णय द्यायला हवा, असं त्यांनी सांगितलं,
उद्धव ठाकरे साई दरबारी
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहपरिवार साईदर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावणार आहेत. तेथून ते ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. यशवंतराव गडाख यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देखील देणार आहेत. गडाखांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे शनिदेवाच दर्शन घेऊन अभिषेक करणार आहेत.