‘सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय असा गृहमंत्री….’, ठाकरेंचा घणाघात
"जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय, असा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये. अशा गृहमंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे", अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण वेश बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात होतो, असं वक्तव्य केल्याने विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. ही फार भयानक गोष्ट आहे. आपल्या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था किती बोगस आहे. तुम्ही साध्या माणसांना छेडतात. पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल, हे केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा मान्य आहे का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा विभाग त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशाचा शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेशांतर करुन वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देवून येतोय, असा गृहमंत्री हा जागेवर राहताच कामा नये. जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय, असा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये. अशा गृहमंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. जो गृहमंत्री स्वत:चे आपले सर्व अधिकार स्वत:च्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरेंची अर्थमंत्र्यांवरही टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि इतर मंत्र्यांवरही टीका केली. “काँग्रेस नेते राहुल गांधी काल संसदेत भाषण देत असताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन ज्याप्रकारे हसत होत्या. त्यांच्या कुणी मंत्री म्हणण्याच्या लायक आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार केलं जात आहे पण इंजिन रुळावरुन खाली जात आहेत. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
‘आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मोंदीची भेट घेऊयात’
उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊयात. मोदी आरक्षणाबाबत जो तोडगा काढतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राजकारण्यांपेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवून चर्चा करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. “याआधी बिहारने आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर हा प्रश्न लोकसभेत सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे. सोबत यायला तयार आहे. मराठा, ओबीसी सर्वच समाजाने मोदींकडे गेलं पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.