Uddhav Thackeray : ‘निराश होऊ नका, खचून जाऊ नका’, उद्धव ठाकरे यांचं निकालानंतर जनतेला आवाहन
"कोरोना काळात कुटुंबप्रमुखांप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र असं वागेल असं वाटत नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने मी महाराष्ट्राला मनापासून सांगितलं होतं. महाराष्ट्र असा वागेल असं काही वाटत नाही. काहीतरी यात गडबड आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीचा निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “तूर्त मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. पण मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं उद्धव ठाकरे नागरिकांना आवाहन करत म्हणाले.
“लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असेल तर बाकीच्या गोष्टी उघड होत्या. सोयाबीनला भाव नाही. कापूस खरेदी नाही,. महिला असुरक्षित आहे, या असंख्य गोष्टी आहे. लाडकी बहीण पेक्षा आमच्यासभेला येणाऱ्या महिलांना घर कसं चालवायचं हा प्रश्न होता. महागाई वाढतेय म्हणून मतदान केलं का. हा टोमणा नाही. या वेळी तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे. महाराष्ट्र विकास आघाडी फार प्रामाणिक वागली हे चुकलं की काय असं वाटतं”, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘त्यांचं अभिनंदन करण्यात कद्रूपणा करायचा नाही’
“२८८ पैकी मोजलेल्या जागा किती आहेत. या जागा किती आहेत. अशाच काही जागा त्यांच्याकडे आहेत. अशी लाट उसळली असं काय काम त्यांनी केलं. ते जिंकले आहेत. पण त्यांचं अभिनंदन करण्यात कद्रूपणा करायचा नाही. मी त्यांचं अभिनंदन करतो. आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत करून त्यात २१०० रुपये दर महिन्याला द्यावी, त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी. निवडणुकीत असा जुमला करावा लागतो असं बोलू नये. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं”, असं आवाहन त्यांनी महायुतीला केलं.
‘काहीतरी यात गडबड आहे’
“कोरोना काळात कुटुंबप्रमुखांप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र असं वागेल असं वाटत नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने मी महाराष्ट्राला मनापासून सांगितलं होतं. महाराष्ट्र असा वागेल असं काही वाटत नाही. काहीतरी यात गडबड आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. “काही गोष्टी सेक्युलर असतात. बेकारी आहे, महागाई आहे. सर्वांनाच या गोष्टी सतावत असतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘चार महिन्यात निकाल कसा बदलू शकतो?’
“पहिली गोष्ट ही आहे की, अडीच वर्ष होऊनही न्यायालयातून निकाल मिळत नाही. त्या आधीच निवडणूक होते. आमच्या नावाचा, निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही. यातच गफलत आहे. मग विश्वास ठेवायचा कुणावर. आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली काम करावं लागेल. तुमचा बंगला कोणता तुम्ही निवडा. अनाकलनीय आहे. अनपेक्षित आहे. हा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी मान्य करावाच लागतो. अमान्य आहे, म्हटलं नाही. लोकसभेत लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो. या सरकारने असे कोणते दिवे लागले. चार महिन्यात निकाल कसा बदलू शकतो?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.