VIDEO: उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान
उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कायम काम करतात हे सर्वांना माहीत आहे. राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा.
मुंबई: उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कायम काम करतात हे सर्वांना माहीत आहे. राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं.
मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
हे तर महाविनाश आघाडी सरकार
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. रोज वर्तमानपत्रात अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावं लागत आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूंना नावं ठेवत आहे. रशीद अल्वीही हिंदूंवर टीका करत आहे. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचारांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा
महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं आव्हान देतानाच 2019मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजप आल्यानंतर जगाला पटेल कळले
आपला पक्ष देशासाठी काम करतो. काँग्रेस व्यक्तीसाठी काम करतो. म्हणून आपण भारत माता की जय म्हणतो. तर ते सोनिय गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद आणि प्रियंका गांधी जिंदाबाद म्हणत असतात. जेव्हापासून केंद्रात भाजपचं सरकार आलं आणि सरदार पटेलांचा इतिहास जगासमोर आला. गुजरातमध्ये पुतळा उभारल्यानंतर पटेल जगाला कळले. आंबेडकरांनाही काँग्रेसनेच दोनदा पराभूत केलं होतं. उलट आपण आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या जागा तीर्थक्षेत्रं म्हणून विकसित केल्या. 26 नोव्हेंबर हा संविधान गौरव दिवसही आपण साजरा केला, असंही ते म्हणाले.
छोट्या लोकांना मोठ्या कामासाठी पुरस्कार
पूर्वी मोठ्या लोकांना छोट्या कामासाठी पुरस्कार दिला जायचा. मोदी सरकार आल्यानंतर छोट्या लोकांना मोठ्या कामासाठी आपण पुरस्कार देत आहोत. पूर्वी पुरस्कारासाठी लोक धावत होते. आता तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला स्वत:हून पुरस्कार दिला जातो, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय सरचिटणीस, प्रभारी सी.टी. रवी https://t.co/nM9sBTgZoG
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 16, 2021
संबंधित बातम्या:
भाजपने सरकार पाडण्याचा नाद सोडला?, चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा
कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात