प्रसाद लाड म्हणाले, तुमच्यासाठी लिफ्ट खाली करतो, ठाकरे म्हणाले, आमचा पक्षच खाली केला
विधान परिषदेच्या सभागृहातून बाहेर येताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अचानक लिफ्टच्या शेजारी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांची भेट झाली.
मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज विधान भवनात गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राज्यभरातील लोकप्रतिनिधी आज विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटतात. त्यांच्या भेटीगाठी होते, पुढे याच भेटीगाठींचं रुपांतर मैत्रीत होतं. मग ही मैत्री सत्ताधारी पक्षांमध्ये आमदारांमध्ये असते किंवा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाती आमदारांमध्ये होते. राज्याच्या राजकारणाला एक संस्कृती आहे, असं मानलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेते समोरासमोर आल्यावर एकमेकांसोबत खेळीमेळीने वागतात. हे नेते हसत-हसत एकमेकांना मिश्किल टोमणे लगावतात किंवा कधीकधी हसत-हसत खोचक टोलेदेखील लगावतात. असाच काहीसा प्रकार आज विधान भवनात बघायला मिळाला. संबंधित प्रकार कॅमोऱ्यात अचूकपणे कैद झालाय.
विधान परिषदेच्या सभागृहातून बाहेर येताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अचानक लिफ्टच्या शेजारी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांची भेट झाली. यावेळी ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करु, असं प्रसाद लाड म्हणाले. त्यावर ठाकरेंनी आमचा सर्व पक्षच खाली केला, असा खोचक टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दोघांमधील संभाषण नेमकं काय?
विधान परिषदेतून बाहेर येताना उद्धव ठाकरे, दरेकर, लाड यांची भेट
उद्धव ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करु- प्रसाद लाड
आमचा सगळा पक्षच खाली केलात, ठाकरेंचा लाड यांना खोचक टोला
लोकसभा निवडणुकीत काय घडणार?
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडलीय. विशेष म्हणजे पक्षाच्या प्रमुखांच्या हातून पक्ष निसटला आहे. त्यामुळे जनतेच्या मनात या घटनेबाबत काय भावना आहे हे आता निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत मोदी सरकारला पुन्हा संधी द्यायची का? याबाबतही मतदार आपला कौल देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजप या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना शत्रू मानत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.