हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला, पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या जागावाटपाबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी पवार आणि ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आज भेट घडून आली आहे. या भेटीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिनेश दुखंडे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 5 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता जाहीर व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे. पण तरीही महाविकास आघाडीचा काही जागांवर तिढा अजूनही कायम आहे. या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अंतिम टप्प्यात असलेल्या जागावाटपावर चर्चा करणं आणि दोन जागांबाबत जो तिढा कायम आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या 23 मतदारसंघांची यादी आहे. ठाकरे गट 23 मतदारसंघांवर ठाम आहेत. यापैकी एक ते दोन जागा त्यांची मित्र पक्षाला सोडण्याची तयारी आहे. त्यामुळे ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवू शकतं.
ठाकरे गट 23, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 15 असं मविआच्या जागावाटपाचं सूत्र सध्या दिसत आहे. पण काही जागा मित्रपक्षांनादेखील सोडायच्या आहेत. काही जागांच्या आदलाबदलीचे विषय आहेत. विशेषत: कोल्हापूरचं प्रकरण हे प्रतिष्ठेचं बनलं आहे. काँग्रेस शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देऊ इच्छित आहे. तर ठाकरे गटाने अट घातली आहे की, तुम्हाला कोल्हापूर हवं असेल तर आम्हाला सांगली द्या. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज नवा प्रस्ताव ठेवला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हातात मशाल घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करु. याचाच अर्थ ठाकरे गटाकडूनही शाहू महाराजांना प्रस्ताव देण्यात आला आहे.
जागांची आदलाबदल झाली तर काय?
जागांची आदलाबदल झाली तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील ज्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते डबल केसरी आहेत. सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली तर चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो. त्यांना उमेदवारी मिळू शकते. भिवंडीच्या जागेचाही पेच आहे. ती जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हं आहेत. तर ठाकरे गट मुंबईत 4 जागांवर निवडणुका लढवणार आहे.
बैठकीत अंतिम फैसला होणार?
उद्धव ठाकरे 23 जागांचा प्रस्ताव घेऊन सिल्व्हर ओकवर आले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला होता. जागावाटपाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बैठका सुरु आहेत. लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता जागावाटपासाठी अंतिम निर्णय होणं गरजेचं आहे. यासाठीच आजची बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीत नेमकं काय ठरतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाचा ‘या’ 23 जागांवर पक्का दावा
- जळगाव
- नाशिक
- पालघर
- ठाणे
- कोल्हापूर
- बुलढाणा
- हातकणंगले
- शिर्डी
- हिंगोली
- छत्रपती संभाजीनगर
- धाराशिव
- परभणी
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- यवतमाळ-वाशिम
- मावळ
- रायगड
- रामटेक
- दक्षिण मुंबई
- दक्षिण-मध्य मुंबई
- उत्तर-पश्चिम मुंबई
- ईशान्य मुंबई
- उत्तर मुंबई
- कल्याण-डोंबिवली