महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यांचे हे आदेश आगामी काळातील घडामोडींसाठी जास्त महत्त्वाचे मानले जात आहेत.
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची उद्या संध्याकाळी चर्चगेट येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींशी संबंधित घडामोडी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी देखील घडत असल्याची माहिती मिळत आहे. आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचाली वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानीच ही बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.
निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारी करा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीत केली आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कल्याण, अंबरनाथ, कळवा, बोरिवली,दहीसर, मागाठाण्याचे पदाधिकारी हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या.
उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाचे आदेश काय?
- निवडणुकांसाठी तयार राहा. निवडणुका कधीही होऊ शकतात.
- मतदान यादीमध्ये ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा.
- ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे त्यांच्याशी संपर्क करुन अडचणी सोडवा.
महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या संयुक्त बैठक
महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुका तसेच राज्यातील गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी या विषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.