उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो. त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे. गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला. कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील यांना इशाराही दिला. आम्ही मदत करतो, तुम्ही मदत करा, असे आवाहनही केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
शेकापाचे जयंतराव तुम्ही विचित्र काम करु नका. आलिबागमध्ये मी माणुसकी दाखवली. तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली. त्यानंतर तुम्ही उमेदवारी उरण, पेण, पनवेल, सांगलो या ठिकाणी मागे घेतली नाही. लढायचे तर उघड लढाई करु या, मैत्री करायची तर उघड करु या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही तुम्हाला आलिबागला मदत करतो, तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला मदत करा. जयवंतराव आता ठरवा महाराष्ट्र द्रोहीला मदत करायची की महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांना मदत करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
जमीन अदानींना देणार
मी हेलिकॉप्टरने येताना पहिले, प्रचंड मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे जमिनीला भाव येतील. जमिनीला भाव आल्यावर अदानींना देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी रोजगार हवे की नको. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे नाही का? मग मशालीशिवाय पर्याय नाही. रायगडमधील चारही जागा निवडून आणा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, चार दिवस राहिले. सुखाने राहा. त्यानंतर विधानभवनाचे दार तुला दिसणार नाही. यापुढे दादागिरी केली तर २३ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि गद्दार आहे, पाहून घेऊ, काय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो. त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे. गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला. मी वर्षा बंगला सोडला तेव्हा हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. हा आपला आमदार कसा होऊ शकतो? याला खडी फोडायला पाठवतो. मी मुख्यमंत्री होतो हा एक ही काम घेऊन आला नाही. त्यानंतर खोके घेऊन तिकडे गेला.
निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक पैसेवाले माझ्यावर आले होते. मला उमेदवारी द्या, असे ते म्हणत होते. परंतु मी निष्ठावंतांना उमेदवारी दिली. काही बोलतात ‘बंटगे तो कटेंगे?’ काय हे मी मुख्यमंत्री असताना जाणवले होते का? कोण कापले गेले? आपले सरकार पडल्यावर हे आले आणि उद्योग घेऊन गुजरातला गेले.