Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव मुख्यमंत्री का झाले? पक्षप्रमुखांनी शरद पवारांसोबतचा संवाद जशास तसा सांगितला
एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव मुख्यमंत्री का झाले, याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये उलगडून सांगितले आहे. लाचारी आणि मजबुरी न स्वीकारता सर्व शिवसैनिकांच्या साथीने हे सर्व केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे : आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं, असे ठरल्यानंतर तीन पक्षाची बैठक झाली. त्यात ठरले. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला बोलावले आणि सांगितले. हे ठरले पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मी म्हटले, पवार साहेब मस्करी करता का? मी महापालिकेत फक्त महापौरांना शुभेच्छा द्यायाल गेलो. नगरसेवक नसताना मी कसा मुख्यमंत्री (Chief Minister) होणार हे बोललो. त्यावर पवार म्हणाले. तुम्हीच जबाबदारी घ्या. ठीक आहे, घेतो म्हटलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव मुख्यमंत्री का झाले, याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये उलगडून सांगितले आहे. लाचारी आणि मजबुरी न स्वीकारता सर्व शिवसैनिकांच्या साथीने हे सर्व केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘शिवसेना प्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच’
ते म्हणाले, की शिवसेनेचे आमदार गायब असून सुरतला गेले, गुवाहाटीला गेले. त्यात मला पडायचे नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते. मी म्हटलेही कोणती लोकशाही आहे? आपल्या माणसांना एकत्र ठेवावे लागते. अरे हा कोठे गेला, तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती. बाथरूमला गेला तरी शंका घेतो म्हणजे लघुशंका. मला काहीच अनुभव नव्हता. पण मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच म्हणून रणांगणात उतरलो, मुख्यमंत्रीपदी बसलो. जनतेने प्रेम दिले. पद महत्त्वाचे नाही, तुम्ही लोकांची किती कामे करता, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
‘माझ्यावर विश्वास टाकला’
मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले, की शरद पवारांनी विश्वास टाकला, सोनिया गांधींनी विश्वास टाकला. त्यांनी सहकार्य केले. प्रशासनानेही सहकार्य केले, असेही ते म्हणाले. पद महत्त्वाचे नाही, तर तुम्ही जे काम करता ते महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आले. आता मी या पदाला चिपकून बसत नाही. तुम्ही सांगा मी पायउतार होतो. तुम्ही म्हणाल हे नाटक आहे. हे अजिबात नाटक नाही. संख्या किती कुणाकडे आहे. गौण विषय आहे. शेवटी ही लोकशाही आहे, असे ते म्हणाले. तसेच एकानेही माझ्याविरोधात मतदान केले तरी ती माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणून माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडतो. मी माझे मन घट्ट करून बसलो आहे. मुख्यमंत्रीपदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही. मात्र हे प्रेम असेच ठेवा, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे