पक्ष फोडला तरी… उद्धव ठाकरे यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार, पाहा नेमकं काय म्हणाले?
"मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करुन मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा आहे की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी आशा आहे. तशी आमची सर्वांची प्रार्थना आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष फुटीनंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कायदेशीर मुख्यमंत्री नाहीत, अशी टीका केली जात होती. पण आज त्यांनी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करणं टाळलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करुन मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा आहे की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी आशा आहे. तशी आमची सर्वांची प्रार्थना आहे. सभागृहात याबाबत समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात दोन्ही वेळेला एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी मराठा समाजाला सुद्धा धन्यावद देऊ इच्छितो की, त्यांनी एवढा मोठा लढा दिला आहे. मला सरकारला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही हा प्रमाणिकपणे प्रयत्न केला. तुमच्या प्रामाणिकपणाबाबत मी आज शंका घेत नाही. पण त्याकरता मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी स्वत: मराठा नेते मनोज जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तिथे जालनाला अंतरवली सराटी गावात गेलो होतो. ज्या निर्घृणपणाने, निर्दयीपणाने आंदोलकांवर अत्याचार करण्यात आला होता. डोकी फोडली होती. पण त्याची काही गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता”, असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.
‘मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो’
“मला राजकारणाबाबत जास्त काही बोलायचं नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व पातळीवर टिकेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, अशी मी आशा बाळगतो”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच “हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिलं आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर याबाबत स्पष्ट होईल. पण तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील तरुणांना कुठे नोकरी मिळणार हे सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीत दोन मतं? ठाकरे म्हणाले…
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, असं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी टिकेल, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत दोन मतं आहेत का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “महाविकास आघाडीत दोन मतं असण्याचा प्रश्नच नाही. दोन मतं असती तर आम्ही सभागृहात एकमताने विधेयक मंजूर केलंच नसतं. तुम्ही नीट समजून घ्या. मी मराठा समाजालाही सांगतोय. गेल्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता. पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झालीय. आतासुद्धा सरकारने ज्या पद्धतीने हमी घेतली आहे ती निवडणुकीच्या तोंडावर आहे. निवडणूक काढून घेण्याचा डाव तर नसेल ना? असा प्रश्न मला आज उपस्थित करायचा नाही. कारण मला मध्ये राजकारण आणायचं नाही. पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर भरोसा ठेवणं कठीण आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही’
यावेळी उद्धव ठाकरेंना मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी टीका करणं टाळलं. “त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही. मी परत एकदा सांगतो, छगन भुजबळ असतील किंवा आम्ही सगळेजण सांगत होतो की, दुसऱ्याच्या न्याय हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे. तसा तो त्यांनी प्रयत्न केलाय. त्याची खात्री घेतलीय. न्यायालयात टिकणार याची खात्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. त्यावेळेसही एकमताने ठराव मंजूर झाला होता. हायकोर्टातही ते आरक्षण टिकलं होतं. हायकोर्टात युक्तिवाद करणारीच टीम सुप्रीम कोर्टात होती. पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण मान्य केलं नव्हतं. आमच्या सरकारच्या काळात निवृत्त न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत होती. या समितीने एक अहवाल दिला होता. पण यांनी गद्दारी करुन सरकार पाडलं. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे सरकार टिकेल अशी आशा आहे”, असं ठाकरे म्हणाले.