ठाकरे गटाची लोकसभा-विधानसभेची आखणी आतापासून, प्रकाश आंबेडकर यांना असं बळ देणार
शिवसेना ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आखाडी आणि ठाकरे गटाची युती असणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी बळ देणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गट नव्या उभारीने कामाला लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात घट्ट मैत्री झालेली बघायला मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गट प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी लोकसभेची दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडणार आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी संकेतही दिले आहेत. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शिवसेना ठाकरे गट मुंबईतून लढवण्याची चर्चा आहे. ठाकरे गट मुंबई दक्षिण मध्यची लोकसभा जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे हे सध्या दक्षिण मध्यचे विद्यमन खासदार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गट मुंबईत सहा जागांचे उमेदवार बदलणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.
ठाकरे गटाची मुंबईतील 6 जागांसाठी रणनीती तयार?
ठाकरे गट मुंबईत वंचित प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जागा सोडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी केल्याचीदेखील चर्चा आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात खासदार अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांच्या जागी अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. तर उत्तर पश्चिममधून सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीवर चर्चा आहे.
‘दक्षिण मुंबईमध्ये आमचाच प्रभाव’, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असल्याचं वक्तव्य केलं आहे. “दक्षिण मध्यची जागा आमच्याकडेच होती. सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले तिथेच निवडून आले होते. नंतर ती जागा आम्ही सोडून दिली होती. त्यामुळे ती जागा आमच्यासाठी नवीन नाहीय. त्या जागेवर आमचा प्रभाव आहे. मागणार किंवा नाही हे त्यावेळेस ठरेल. अजून याबाबतचं राजकारण व्हायचं आहे. समीकरणं आज आपल्याला दिसत आहेत ती तशीच राहणार, असं सांगता येत नाही. कारण त्यामधून काही जण गळतील तर काही जण नव्याने येतील अशी परिस्थिती आहे”, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
‘दोन बॉम्ब फुटले, आता…’
प्रकाश आंबेडकर यांनी याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे बॉम्ब फुटणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात, याचेही संकेत आज प्रकाश आंबेडकर यांनी आज दिले आहेत.
“महाविकास आघाडीचे कालचे नाना पटोलेचे स्टेटमेंट, मी अगोदरही म्हणालो होतो की, काँग्रेसचे अनेक ठिकाणी स्वतंत्र जाऊ, अशी परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीत अजून बरंच काही घडायचं आहे, असं मी मानतो. त्यानंतर जे काही बाहेर पडेल ते खरं बाहेर पडेल, असं मी मानतो. त्यामुळे वेट अँड वॉच. मी म्हटलेलो दोन बॉम्ब फुटतील, ते दोन बॉम्ब फुटले. आता तुम्हाला असं सांगतो की, अजून काही घडणार आहे, ते घडू द्या. त्यानंतर राज्यातील राजकारण स्थिर होईल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.