भाजपच्या घराणेशाही विरोधात उद्धव ठाकरे यांचा नवा नारा; भाजपच्या नाकीनऊ येणार? काय आहे नवी घोषणा?
इंडिया आघाडीची दोन दिवसापासून सुरू असलेली बैठक संपली आहे. आता पुढची बैठक तामिळनाडूत होणार आहे. आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहेत. हे ठराव घेऊन इंडिया आघाडी लोकांसमोर जाणार आहे.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक संपली आहे. आता पुढील बैठक तामिळनाडूत होणार आहे. आजच्या बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी इंडिया आघाडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यावेळी तीन ठरावही मंजूर करण्यात आले आहे. भाजपने विरोधकांना नमवण्यासाठी घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला आहे. तर भाजपच्या घराणेशाहीच्या मुद्द्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या नाकीनऊ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या घराणेशाही विरोधात मित्र परिवारवादाचा नारा दिला आहे. आम्ही एक एक पाऊल पुढे येत आहोत. त्यामुळे इंडियाआघाडीच्या विरोधकात घबराट निर्माण झाली आहे. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. आम्ही सर्व देशप्रेमी आहोत. आम्ही अलान्सचं नाव इंडिया घेतलं आहे. त्यामुळे आमचे विरोधक कोण आहेत हे तुम्हाला समजलं असेलच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मित्रपरिवारवादा विरोधात लढणार
आजची मिटिंग चांगली झाली आहे. आम्ही सर्वांनी हुकूमशाही विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढणार आहोत. आम्ही जुमलेबाजांविरोधात लढणार आहोत. आम्ही मित्रपरिवारवादा विरोधातही लढणार आहोत. सबका साथ सबका विकास हा नारा मी ऐकला होता. निवडणुकीनंतर सर्वांना लाथ आणि मित्र परिवाराचा विकास झाला. पण आता घाबरू नका. भयमुक्त भारतासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जुडेगा भारत, जितेगा इंडिया
केंद्र सरकारने एलपीसी गॅस स्वस्त केले. पण 2014 मध्ये गॅस सिलिंडरची जी किंमत होती त्यानंतर किती भाव वाढवले हे लोकांना माहीत नाही का? पाच वर्ष लूट आणि निवडणुकीवेळी सूट हेच या सरकारचं धोरण राहिलं आहे. गॅस स्वस्त केले, पण शिजवणार काय? हे सर्व मुद्दे आहेत. आम्ही नारा दिला आहे. जुडेगा भारत, जितेगा इंडिया आहे. ही लढाई सर्वांची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी वाचलेले ठराव
येणारी लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढवणार आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जागा वाटप करू आणि त्यावर तोडगा काढू.
लवकरात लवकर देशभरात लोकांच्या प्रश्नांवर सभा, संमेलने घेऊ.
जुडेगा भारत, जितेगा इंडिया या स्लोगनसह वेगवेगळ्या भाषेत आम्ही प्रचार करणार आहोत.