भाजपकडे 10 वर्षात 8 हजार कोटी कुठून आले?, जे काँग्रेसला जमलं नाही ते… उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
केंद्रात मोदी सरकार आलं. तेव्हापासून फक्त फसवाफसवी सुरू आहे. योजनांचं नाव बदललं जात आहे. दुसरं काही करत नाही. काहीच काम केलं नाही. त्यांनी आता जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे. भ्रष्टाचार करा. भाजपमध्ये या, तुमचं वाकडं होणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे, असा घणाघाती हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई | 3 मार्च 2024 : काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणाऱ्या भाजपला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षरश: झोडपून काढले. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या निधीवरून जोरदा8 र हल्ला चढवला. जे काँग्रेसला दहा वर्षात जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं, आणि वर हे लोक भाजपला भ्रष्टाचारी म्हणत आहेत. गेल्या दहा वर्षात भाजपकडे 8 हजार कोटी कुठून आले? कशासाठी आले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धारावीत पार पडलेल्या जाहीरसभेतून उद्धव ठाकरे यांनी हा संतप्त सवाल केला.
निवडणूक रोख्यांची (निधी) माहिती उघड झाली आहे. त्यात भाजपकडे 8 हजार कोटी असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसकडे फक्त 800 कोटी रुपये आहेत. मग कुणी देशाला लुटले? 10 वर्षात एवढे पैसे आले कुठून? जे 10 वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं हे मोदी बोलतात ते खरं आहे. जनतेला लुटायचं आणि मोठमोठ्या जाहिराती करायच्या. या पैशाचा वापर त्यासाठी करत आहेत, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
जाहिरातीवरील महिला सापडत नाहीत
भाजप जाहिरातींमध्ये महिलांचा फोटो वापरतो. पण जाहिरातीत दिसणाऱ्या या महिला शोधूनही सापडत नाहीत. अशाच एका महिलेचा एका चॅनलनं शोध लावला. तिचं नाव लक्ष्मीबाई. ती बाई पश्चिम बंगालची. त्या बाईलाच माहीत नव्हतं तिचा फोटो कधी काढलाय. तिला घर मिळालं का विचारलं? तेव्हा ती नाही म्हणााली. कारण तिला घरच नव्हतं. ती भाड्याच्या घरात राहते. अशा पद्धतीने भाजप फसवणूक करत आहे. जनतेचा अजूनही सरकारवर नाही, पण सरकारी जाहिरातीवर विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचं हिंदुत्व वेगळं
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्ला केला. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं वेगळं आहे. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आमच्यासोबत समाजवादी आले, मुस्लिम येतात. आमचं हिंदुत्व चुल पेटवणारं आहे. तुमचं हिंदुत्व पेटवणारं आहे. आमचं हिंदुत्व गाडगेबाबांचं आहे. भुकेल्यांना अन्न आणि तहानेल्यांना पाणी देणारं आमचं हिंदुत्व आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींची फसवाफसवी
आठवर्षापूर्वी मोदींनी जाहीर सभेतून बिहारला सव्वा लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यापैकी किती रक्कम आली? पॅकेज आलं असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी नाटक होतं. मोदींचा फसवीफसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं? धोंडे पडले तरी त्यांना शेंदूर फासून देव करता येतं. हे काय करणार?, असा सवाल त्यांनी केला.