गंडेदोरे, ताईतवाल्या सरकार विरोधात रान उठवावं लागेल; ‘सामना’तून जोरदार हल्ला
कर्नाटकाच्या मुद्द्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकने अरे केल्यास कारे ने उत्तर देऊ असं भाजपने म्हटलं आहे.
मुंबई: शिवरायांचा अपमान आणि जनता गेली उडत असं कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल, असा इशारा देतानाच नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र यायला हवं. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखवण्यासाठी हिंमतबाज मर्दांचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल, असा इशाराच ठाकरे गटाने राज्य सरकारला दिला आहे. दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.
कर्नाटकाच्या मुद्द्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकने अरे केल्यास कारे ने उत्तर देऊ असं भाजपने म्हटलं आहे. हे भाजपचं ढोंग आहे. भाजपमध्ये तेवढी हिंत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.
जे लोक शिवाजी महाराजांचा अवमान निमूटपणे सहन करतात ते कारे ची भाषा करतात हाच एक विनोद आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे चाळीस खोकेबाज आमदार आणि बिल्डर मित्रांसाठी सुरू आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
एखादे सरकार रामभरोसे चालत असते. मात्र, राज्यातील मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाला या गंडे दोरे ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिंदे फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केला आहे. विरोधी पक्षांना एकत्र वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात एकापेक्षा एक तज्ज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील जाणार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या संस्थेवर अजय आशर यांची नियुक्ती केली. अजय आशर यांच्यासाठीच ही संस्था काढल्याचं दिसत आहे. अजय आशर हे या खोके सरकारचे टेकू आहेत. म्हणूनच त्यांची नियुक्ती केल्याची टीकाही करण्यात आली आहे.