Uddhav Thacketa : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम’, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर ‘बाण’
उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह, छत्रपती शिवाजी महाराजांचबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर विविध मुद्द्यांवरुन भाजपवर सडकून टीका केली.
मुंबई : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे’, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राच्या हद्दीतील चाळीस गावं कर्नाटकात येतील, असा दावा करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी केलंय. त्यांच्या याच विधानाचा समाचार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह, छत्रपती शिवाजी महाराजांचबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर विविध मुद्द्यांवरुन भाजपवर सडकून टीका केली.
“महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होतेय, मग ते महाराष्ट्रातील प्रकल्प जाणे, महाराष्ट्राची अस्मिताबद्दल असेल, सातत्याने अवहलेना होतेय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात जणूकाही भूत संचारलेलं आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“जणू काही महाराष्ट्रात माणसं राहतच नाही. महाराष्ट्रात अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाहीय. कुणीही यावं आणि टपली मारावं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं गप्प बसावं. हे आतापर्यंत खूप झालं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांकडून तशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत”, असं देखील ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?
“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही विषयांवर चर्चा व्हायला हवी. मी त्याच विषयातील तिसऱ्या विषयावर बोलतोय. देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. ती पद्धत अपारदर्शक आहे, असं त्याचं मत आहे. नेमणुकीचे अधिकार पंतप्रधानांकडे असावेत, असं त्यांचं म्हणणं आहे.”
“दुसरी एक केस सुप्रीम कोर्टात सुरुय. तिथे निवडणूक आयुक्तांबद्दल अपील केलेलं आहे. त्याबद्दल न्यायमूर्तींचं मत आपण ऐकतोय. या देशाला चांगला निवडणूक आयुक्त पाहिजे. कारण वेळ पडली तर उद्या पंतप्रधानांवर सुद्धा कारवाई करायला तो मागेपुढे पाहणार नाही. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत तपासायला पाहिजे आणि बदलायला पाहिजे.”
“आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. साधारणत: एक प्रघात आहे, ज्यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्या विचारसरणीचीच माणसं ही देशातील सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून जातात. या माणसांची कुवत काय असते?”