Pandurang Sakpal : उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचं निधन
Pandurang Sakpal : पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
(निवृत्ती बाबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं आज अल्पशाः आजाराने निधन झालं. एक कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची दक्षिण मुंबईत ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील अनेक आक्रमक आंदोलनांचे नेतृत्व पांडुरंग सकपाळ यांनी केलं होतं. मागच्या काही दिवसांपासून पांडुरंग सकपाळ यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
दक्षिण मुंबईत शिवसेना वाढवण्यास पांडुरंग सकपाळ यांचा मोठा हातभार होता. जवळपास बारा वर्षांपासून सकपाळ ठाकरे गटाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरही दक्षिण मुंबईत पांडुरंग सकपाळ यांनी गड राखला होता. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली.
त्यानंतर ते सक्रीय दिसले नाहीत
खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाचे राजकारण यामागे असल्याची चर्चा विभागात सुरू होती. विभागप्रमुख पद काढून घेतल्यानंतर पांडुरंग सकपाळ कोणत्या कार्यक्रमात सक्रिय दिसत नव्हते. दक्षिण मुंबईतील आक्रमक चेहरा म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख आहे. अनेक, आंदोलन त्यांनी गाजवली आहेत. महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी जोरदार टीका भाजपने करायला सुरुवात केली.
पांडुरंग सकपाळ धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला.अनेकआंदोलनात पोलिसांचामार खाल्ला.तुरुंगभोगला. पणपांडुरंग मागे हटलानाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असाझुंजार पांडू आम्हाला सोडूनगेला. विनम्र श्रद्धांजली. pic.twitter.com/K86PSpybFD
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 25, 2024
अजान स्पर्धेमुळे वाद
2019 मध्ये पांडुरंग सकपाळ यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अजान स्पर्धा आयोजित केल्यामुळे पांडुरंग सकपाळ यांच्यावर बरीच टीका झाली होती. “मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे” असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं.