निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 1 जानेवारी 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. हे वर्ष निवडणुकींच्या रणधुमाळीचं असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात जागावाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंडिया आघाडीचं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं असेल, या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे मुंबईत तर काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर जागावाटपाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जागावाटपाबाबत आमचं मतभेद नाही, पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसेच भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशीदेखील भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार आहे. या दिल्ली दौऱ्यात जागावाटपावर चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंडिया आघाडीची या महिन्यामध्ये देखील बैठक पार पडली होती. पण जागावाटपाबाबत आणखी एक बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत जागा कशाप्रकारे लढायच्या याबाबत चर्चा होणार आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात फोनवर संभाषण झालं आहे. या जागावाटपाकडे सत्ताधारी पक्षांचं देखील लक्ष असणार आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी एकही संधी सोडणार नाहीत. त्यामुळे इंडिआ आघाडीचं जागावाटप देशासाठी विशेष असणार आहे.