मोठी बातमी! सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येणार; नागपुरातील घडामोडींकडे लक्ष
उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
मुंबई: राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि राज्यात झालेलं सत्तांतर त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद होतो? उद्धव ठाकरे शिंदे सरकारला अधिवेशनात कसे फैलावर घेतात आणि अधिवेशनात कोणते मुद्दे मांडून शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. कोरोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर नगरी अधिवेशनासाठी सज्ज झाली आहे. नागपुरात जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.
त्याशिवाय राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं नागपुरात होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचंही हे पहिलंच अधिवेशन असणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेचे 40 आणि अपक्ष दहा असे 50 आमदार घेऊन त्यांनी सवतासुभा मांडला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून त्यांनी सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदही मिळवलं. शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे कधीच समोरासमोर आले नव्हते.
मुंबईत झालेल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी दांडी मारल्याने शिंदे-ठाकरे समोरासमोर येण्याचा योग जुळून आला नाही. आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने हा योग जुळून येणार आहे.
उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. उद्याचं हिवाळी अधिवेशन फार वेगळं असेल असा दावाही राऊत यांनी केला.
शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याचं राऊत यांनीही स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे हे शिंदे यांना कसे धारेवर धरतात आणि शिंदे हे त्यांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का? एकमेकांशी नजरेला नजर भिडवणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नागपूर अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विदर्भात दोन वर्ष अधिवेशन झालं नव्हतं. त्यामुळे या अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा व्हावी अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांसाठी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचं आयोजन केलं आहे. या चहापानाला विरोधक जाणार की चहापानावर बहिष्कार टाकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.