मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल सर्वात महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया देणार आहेत. उद्धव ठाकरे साडेआठ वाजता प्रसारमाध्यमांसमोर येऊन भूमिका मांडणार आहेत. ते आज रात्री साडेआठ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.
या निकालावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.