आता भूमाफिया गेले बेघर मात्र आम्ही झालो; अनधिकृत बांधकामावर कारवाई होताच सर्वसामान्यांचा टाहो…
जेव्हा बांधकाम उभी राहत होती तेव्हा प्रशासनाने कारवाही केली नाही आता भूमाफिया गेले बेघर मात्र आम्ही झालो असा संतप्त प्रश्न राहिवाशांनी उपस्थित केला आहे.
विरार : महसूल विभागाच्या जागा भूमाफियांनी गिळंकृत करून उभारलेल्या अनाधिकृत चाळीच्या बांधकामावर वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी आज बुधवारी धडक कारवाही केली. या कारवाईत 50 च्या वर अनाधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यात आली आहेत. विरार पूर्व कण्हेर फाटा या परिसरात आज सकाळपासून ही कारवाही सुरू करण्यात आली आहे.कारवाईच्या सुरवातीला नालेश्र्वर येथील रहिवाशाकडून प्रशासना विरोधात आक्रमकता दाखवून विरार फाटा येथे काहीवेळा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो पोलीस प्रशासनाने हणून पाडला आहे.
या कारवाहीमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.मात्र त्या चाळीतील सर्वसामान्य कुटुंबं रस्त्यावर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.
विरार पूर्व मौजे कण्हेर या परिसरातील ज्या जमिनी महसूल विभागाच्या आहेत. त्या जमिनी स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक यांना हाताशी धरून भूमाफियांनी गिळंकृत केल्या होत्या.
त्यावर अनधिकृत चाळी उभारून त्या कमी किमतीत सर्वसामान्य नागरिकांना विकल्याही होत्या. याबाबत वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी आज बुधवारी वसई विरार महापालिका, पोलीस, महावितरण, यांना सोबत घेऊन धडक कारवाही केली.
या कारवाहित 50 च्यावर घरं, दुकानं हे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली आहेत. मात्र त्या परिसरातील सर्व अनाधिकृत बांधकामं भुईसपाट होणार नाहीत तोपर्यंत ही कारवाही अशीच सुरू राहणार असल्याचे तहसीलदार उज्वला भगत यांनी सांगितले आहे.
आज झालेल्या कारवाईत एका नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिलेला आपल्या चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडावे लागले.
आपल्या बाळाला घेऊन घराबाहेर पडताना नवमाता असलेल्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. आमचा काय दोष आहे. आम्हला बेघर केल्या जात आहे. जेव्हा बांधकाम उभी राहत होती तेव्हा प्रशासनाने कारवाही केली नाही आता भूमाफिया गेले बेघर मात्र आम्ही झालो असा संतप्त प्रश्न राहिवाशांनी उपस्थित केला आहे.