मोठी बातमी: मुंबईतील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला, मजूर थेट नाल्यात, दहाजण जखमी
Mumbai Flyover | पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत.
मुंबई: मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल 20 ते 25 मजूर काम करत होते. (Under construction flyover collapsed in Mumbai BKC area)
त्यावेळी या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तुर्तास तरी कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. हा उड्डाणपूल कसा पडला, याचे कारणही अद्याप समजलेले नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
उद्घाटनापूर्वीच नवीन कोपरी पुलाला तडे
काही दिवसांपूर्वी नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने वाद निर्माण झाला होता. पूर्व द्रुतगती महामार्गावरी वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु यापैकी एका मार्गिकेवर तडे गेल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले होते.
मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, 12 जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या केबल पुलची उभारणी
अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झालेल्या उड्डाणपुलांमुळे सध्या मुंबईत मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. यावर उतारा म्हणून लवकरच मुंबई महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत मुंबईत केबल आधारित 12 पूल उभारण्यात येतील. हे काम 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यासाठी 1775 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील 127 वर्षे जुने पूल पाडून त्याठिकाणी केबल पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. या पुलांचे काम 2022 पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले होते.
(Under construction flyover collapsed in Mumbai BKC area)