मुंबई : मुंबईसह (Mumbai) उपनगरात मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत असल्यानं परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचतंय. पुढील चार दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालंय. दहीसर, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि अंधेरी (Andheri) येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकांना बसला आहे. नवी मुंबई भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, आता हिंदमाता पाणी साचण्यापासून सुटका होण्यासाठी साठवण टाक्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे यंदा तरी पाणी साचण्यापासून सुटका होऊ शकते, असं बोललं जातंय.
यंदा तरी पाणी साचण्यापासून हिंदमाता परिसरातील नागरिकांची सुटका होऊ शकते. भूमिगत टाक्यांचा प्रकल्प पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गतवर्षी महापालिकेनं हाती घेतला होता. त्यानुसार प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राउंड इथं भूमिगत टाक्या तयार केल्या आहेत. हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.
पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या मोठ्या भूमिगत टाक्या कमीत-कमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवू शकतील. मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठी भरती असल्यास याचा विशेष उपयोग होऊन या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा महापालिकेला विश्वास वाटत आहे.