VIDEO: ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही; नवाब मलिकांनी योगी आदित्यनाथांना सुनावले
आर्यन खानच्या अटकेनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडबाबतची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच सुनावले आहे. ('UPwood' won't come up by defaming Bollywood: Nawab Malik )
मुंबई: बॉलिवूडला बदनाम करून यूपीवूड कधीच तयार होणार नाही. तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावले.
आर्यन खानच्या अटकेनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडबाबतची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच सुनावले आहे. बॉलिवूडला बदनाम केल्याने यूपीवूड तयार होईल असं योगी महाराजांना वाटत असेल तर ती त्यांची घोडचूक आहे. उत्तर प्रदेशातील गंगा किनाऱ्यावरील लोक इथे आले, त्यांना बॉलिवूडने ओळख दिली. गुजरातमधून आलेल्यांना बॉलिवूडनेच ओळख दिली. महाराष्ट्रातील लोकांनाही ओळख दिली. तामिळनाडूतून आलेल्यांनाही ओळख दिली. मुंबई ही मिनी भारत आहे. या बॉलिवूडला बदनाम करून उत्तर प्रदेशात नेऊन यूपीवूड तयार करू असं ज्यांना वाटतं त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं मलिकर म्हणाले.
तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही
हे षडयंत्र भाजपच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्रातील लोकांना, मुंबईला बॉलिवूडला बदनाम केलं जात आहे. योगी महाराज नोएडामध्ये एक फिल्मसिटी तयार करत आहेत. ते मागे ताज महल हॉटेलमध्ये काही लोकांना भेटले. भाजपचे समर्थक कलाकार त्यांना भेटले. बॉलिवूडला बदनाम केल्याने बॉलिवूड मुंबईच्या बाहेर जाईल असं त्यांना वाटतं. पण दादासाहेब फाळकेंपासून व्ही शांतरामांपासून ते अनेक मराठी कलाकार, दिग्दर्शकांनी बॉलिवूड उभं केलं. बॉलिवूडला ओळख मिळवून दिली. पूर्वी बॉम्बे नाव होतं म्हणून हॉलिवूडच्या धर्तीवर बॉलिवूड हे नाव ठेवलं. बॉलिवूड देशाची संस्कृती आणि ओळख पूर्ण जगात घेऊन जाते. बॉलिवूडवर हजारो लोकांचा रोजगार सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
वसूलीचा धंदा सुरू
महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून होत असल्याचं मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे. एक केस रिया चक्रवर्तीपासून सुरू झाली. वानखेडेंनी एक केस दाखल केली. फिल्मवाल्यांची परेड केली. पण एक वर्ष झालं तरी त्यात एकही अटक झालेली नाही. केस एक वर्षापासून सुरू आहे. जर एखाद्या केसमध्ये गडबड झाली असेल तर अटक झाली पाहिजे. मात्र, इथे त्याच केसच्या माध्यमातून वसूलीचा धंदा सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रेडकर ताई षडयंत्राला बळी पडताहेत
यावेळी त्यांनी अभिनेत्री क्रांती रेडकरलाही सल्ला दिला. रेडकर ताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांच्या षडयंत्राला बळी पडत आहात. तुमचे पतीही या लोकांचे शिकार झाले आहेत, असं ते म्हणाले. याप्रकरणात वानखेडेंनी सर्व हातखंडे वापरले. आधी म्हणाले की माझ्या कुटुंबला या प्रकरणात घुसडण्यात येत आहे. माझ्या मरहूम आईचंही या प्रकरणात नाव घेतलं. पण मी कधीच त्यांच्या आईचं नाव घेतलं नाही. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला. पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही. माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही. लढाई ही अन्यायाविरोधात आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा
VIDEO: क्रांती रेडकरचा संबंध काय?, इथे सर्वच मराठी; संजय राऊत यांचा सवाल
(‘UPwood’ won’t come up by defaming Bollywood: Nawab Malik)