महाविकास आघाडीच्या बैठकीतील आतली बातमी, वंचितच्या ‘या’ 5 प्रमुख मागण्या

| Updated on: Jan 30, 2024 | 6:35 PM

महाविकास आघाडीच्या बैठकीतली आतली बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून आज पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर बैठकीत सहभागी झाले. पण या बैठकीत पुंडकर यांना एक तास बैठकीच्या बाहेर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.

महाविकास आघाडीच्या बैठकीतील आतली बातमी, वंचितच्या या 5 प्रमुख मागण्या
Follow us on

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीची मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा पार पडली. या बैठकीचं अधिकृत निमंत्रण हे वंचित बहुजन आघाडीलादेखील देण्यात आलं होतं. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हे बैठकीसाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना 1 तास बैठकीबाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची बैठक सुरू होती. जवळपास एक ते सव्वा तास झाल्यानंतरही आपल्याला बैठकीत सहभागी करुन घेण्यात आलं नाही म्हणून नाराज झालेले पुंडकर हे ट्रायडेंट हॉटेलच्या बाहेर पडले. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

धैर्यवर्धन पुंडकर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडी बॅकफूटवर आली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी तातडीने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवलं. या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची स्वाक्षरी होती. नाना पटोले आणि संजय राऊत यांनी ट्विटरवर (X) या पत्राचा फोटोदेखील ट्विट केला. या पत्रात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत अधिकृतपणे सहभागी होण्याची साद घालण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीत चांगलाच ट्विस्ट आला. दरम्यान, आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती समोर आली आहे.

वंचितच्या मविआला 5 मागण्या काय?

  • मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीची भूमिका काय? ते स्पष्ट करा
  • कृषी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आघाडीची भूमिका काय आहे? एमएसपी आणि एपीएमसी अॅक्टवरचीही भूमिका स्पष्ट करा
  • वंचित आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडीत अधिकृतपणे कधी घेणार?
  • वंचितच्या इंडिया आघाडीतील सहभागाचे शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीचं पत्र कधी देणार?
  • तुमचा जागा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला काय आहे? असेल तर द्या, नसेल तर तेही सांगा