सांगली जिंकली, आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ; काँग्रेसला विश्वास

| Updated on: Feb 23, 2021 | 7:07 PM

सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेत महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले आहेत. (varsha gaikwad taunts bjp over sangli mayor election)

सांगली जिंकली, आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ; काँग्रेसला विश्वास
Varsha Gaikwad
Follow us on

मुंबई: सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेत महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे. सांगली जिंकली आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ, असा प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. (varsha gaikwad taunts bjp over sangli mayor election)

नेमकं काय घडलं?

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली. मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.

हे यश एकजुटीचं प्रतिक

या विजयावर वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! हे यश महाविकास आघाडीच्या एकजुटीचं प्रतिक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला धोबीपछाड देऊ, अशी खात्री आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार

पूणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते आणि त्याच्यावर सांगली महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका तपासे यांनी केली आहे.

राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ

सांगली पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड देऊ, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या  एकजुटीचा विजय आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. (varsha gaikwad taunts bjp over sangli mayor election)

 

संबंधित बातम्या:

जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली, महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

सांगली महापौर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, सत्ताधाऱ्यांचं टेन्शन कायम

(varsha gaikwad taunts bjp over sangli mayor election)