वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा भावनिक क्षण, पक्षप्रमुख म्हणाले, ‘उशीर केला…’
'सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते', ही हिंदी भाषेतील प्रसिद्ध म्हण आहे. ही म्हण सांगण्यामागील कारण म्हणजे सध्या वसंत मोरे आणि ठाकरे गट यांच्याभोवती सुरु असलेलं राजकारण. वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता पुण्यात नवं राजकीय समीकरण बघायला मिळणार आहे. वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे वसंत मोरे हे एकेकाळी शिवसेनेचेच अविभाज्य भाग होते. ते अनेक वर्षांनी पुन्हा आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे नेमकं काय बोलले? याबाबत वसंत मोरे यांनी माहिती दिली.
पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर उमेदवारी लढवणारे उमेदवार वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे ते आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला स्वत: वसंत मोरे यांनी दुजोरा देत पक्षप्रवेशाची तारीखदेखील सांगून टाकली आहे. येत्या 9 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
वसंत मोरे यांना पक्षप्रवेशानंतर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. “आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. यावेळी वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतून बाहेर का पडत आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वसंत मोरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “मी वंचितमध्ये गेलो होतो. मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही”, असं वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना मान्य केलं.
‘उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं आणि…’
“मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतोय”, असंदेखील वसंत मोरे यावेळी म्हणाले. “आगामी महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शिवसेनेकडून कडवं आव्हान देऊ”, असंदेखील वसंत मोरे म्हणाले. वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले”, अशी प्रतिक्रिया दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातून कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. “मला दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो”, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. “पुणे शहरात माझं मतदान नव्हतं. माझा तो भाग नव्हता. तरीही मला लोकसभेत चांगली मते मिळाली”, असा दावा वसंत मोरे यांनी केला. “माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहणार. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे. 10 नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे”, असं वसंत मोरे म्हणाले.