गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर वाशीचे कोरोना सेंटर सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत लोकार्पण

| Updated on: Jun 11, 2020 | 10:48 PM

वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बाराशे खाटांचे कोविड-19 रुग्णालय उभारण्यात आलं आहे (Vashi COVID center starts).

गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर वाशीचे कोरोना सेंटर सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत लोकार्पण
Follow us on

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना वाशीचे कोरोना सेंटर (Vashi COVID center starts) तातडीने सुरु करण्याबाबत इशारा दिल्यानंतर आजपासून (11 जून) हे सेंटर सुरु करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या रुग्णालयाचं अत्यंत साध्यापद्धतीने लोकार्पण करण्यात आलं (Vashi COVID center starts).

वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बाराशे खाटांचे कोविड-19 रुग्णालय उभारण्यात आलं आहे. गणेश नाईक यांनी या रुग्णालयाची काल (10 जून) पाहणी केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना राग अनावर झाला होता. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्तांना फोन करुन कोणत्याही उद्घाटनाशिवाय तातडीने रुग्णालय सुरु करण्यात यावं, असा इशारा दिला. त्यानंतर आज या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं.

दरम्यान, “सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयामुळे शहरातील अन्य उपचार केंद्रांवरील रुग्णांचा ताण कमी होणार आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन उद्घाटनाची कोणतीही औपचारिकता न करता गुरुवारपासून हे रुग्णालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आजपासूनच कोविडच्या रुग्णांना या रुग्णालयात थेट प्रवेश दिला जाणार आहे”, असं आयुक्त मिसाळ यांनी स्पष्ट केलं.

या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तूर्तास उपचार केले जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केलं. याआधी वाशी सेक्टर १४, सीबीडी सेक्टर ३, पनवेल येथील इंडिया बूल्स, नेरुळ येथील आगरी-कोळी भवन आणि घणसोली-सावली या ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत. या ठिकाणी कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तर तीव्र लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटल, सीबीडी येथील अपोलो हॉस्पिटल आणि महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात उपचार केले जातात.

या रुग्णालयामुळे नवी मुंबईतील सर्व कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होणार आहेत. यासोबतच कोविड रुग्णालयात 50 व्हेंटिलेटर ही उपलब्ध करणार असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. नवी मुंबई प्रमाणे राज्यात गरज असेल तिथे अशाप्रकारे रुग्णालय उभे करण्याचीही संकल्पना त्यांनी यावेळी मंडळी.

सिडको एक्झिबिशन कोविड रुग्णालयाची 1200 खाटांची क्षमता आहे. त्यापैकी 500 खाटा ऑक्सिजन तर उर्वरित जनरल रुग्णांसाठी असणार आहेत. तब्बल दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्याचे पालिका आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.

संबंधित बातमी :

भाजप आमदार गणेश नाईकांना राग अनावर, मनपा आयुक्तांवर भडकले