मुंबई : पावसाळा आला की मुंबई आणि परिसरातील कुचकामी सांडपाणी व्यवस्था नागरिकांच्या हालअपेष्टांचं कारण ठरते. कांदिवलीतही हेच चित्र दिसलंय. कांदिवलीतील वार्ड क्र 21 मधील लालजी पाडा, भाजी मार्केटमध्ये चक्क साठलेल्या गटारीच्या पाण्यात भाजीपाला विक्रीची नामुष्की ओढावलीय. इतकंच नाही तर नाईलाज असल्यानं नागरिकांनाही याच पाण्याच उभं राहून भाजीपाला खरेदी करावं लागत आहे. एकीकडे कोरोना संसर्गाचं संकट असताना दुसरीकडे या दुषित पाण्यात भाजीपाला खरेदी करावा लागल्यानं नागरिकांमधून चांगलाच संताप व्यक्त केला जातोय (Vegetable market in drainage water in Kandivali after rain).
विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका वारंवार पावसाच्या साठलेल्या दुषित पाण्यातून चालल्याने लेक्टोसारखे आजार होऊ शकतात असा इशारा देतेय. मात्र, नागरिकांना या पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय.
कांदिवलीच्या या भागात दरवर्षी एक तास पाऊस झाला तरी गुडघ्यापर्यंत पाणी साचतं. याच दुर्गंधीयुक्त गटाराचं सांडपाणी मिसळलेल्या पावसाच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. इतकंच नाही तर दैनंदिन भाजीपाला विक्री आणि खरेदी देखील याच धोकादायक पाण्यात करावी लागते. अशाप्रकारे भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर संतापही व्यक्त करतात. मात्र, याचा प्रशासनावर किंवा संबंधित लोक प्रतिनिधींवर काहीही परिणाम होत नाही.
या भागात प्रतिभा गिरकर या नगरसेविका आहेत, तर योगेश सागर हे आमदार आहेत. हा भाग आर/दक्षिण बीएमसी कांदीवलीत येतो. एकूणच जगभरात संसर्गजन्य आजाराने आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती तयार केलेली असताना अजूनही जर यावर लक्ष दिलं जात नसेल तर प्रशासन कधी जागं होणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Vegetable market in drainage water in Kandivali after rain