आतली बातमी फुटली, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री यांच्यात 50 मिनिटे चर्चा काय? महत्त्वाची माहिती समोर
VIjay Wadettiwar meet Eknath Shinde | विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर आलीय.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. विजय वडेट्टीवार आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यांचा विदर्भात चांगला दबदबा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यापासून आक्रमकपणे सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांबद्दल अनके मोठमोठे दावे केले आहेत. तर सत्ताधारी पक्षांकडूनही त्यांच्याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. अजित पवार यांच्यानंतर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते देखील सत्तेत येतील, अशी चर्चा सत्ताधारी नेत्यांकडून रंगवली जाते.
विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी हे चांगले वक्ते नाहीत, असं परखड मत त्यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले होते. ते सत्ताधारी पक्षात सामील होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. असं असताना आज अचानक विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
भेटीमागचं खरं कारण काय?
दरम्यान, विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागील खरं कारण समोर आलंय. आगामी मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्वत: विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.
“मंत्रीमंडळ बैठकीच्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांना चार महिने अनुदान मिळाले नाही. तसेच कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच ललित पाटील प्रकरणी योग्य चौकशी आणि कारवाई करण्याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.