पंतप्रधान मोदी यांच्याकडून नारायण राणे यांना ‘ही’ समज?, ‘थेट मंत्रिपद काढण्याचा इशारा’, नेमकं प्रकरण काय?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातलाय, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. नारायण राणे लोकसभेची पायरी विसरले आहेत. पीएला काढा, नाहीतर मंत्रिपद घेणार, अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केलाय.
“नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. पीएची कामं पटवापटवीची. अनेकांना पटवून गंडा घातला. मोदींच्या ते लक्षात आलं आणि वॉर्निंग दिली की, पहिले त्याला हाकलून दे, नाहीतर मंत्रीपद काढून घेणार”, असा दावा विनायक राऊतांनी केला.
“नारायण राणे लोकसभेची पायरी चढायला विसरले आहेत. ते अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत”, असं विनायक राऊत म्हणाले.
नारायण राणे आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. नारायण राणे यांनी अनेकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणे यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक घडत असते.
विनायक राऊत यांनी याआधीही अनेकदा नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. यावेळी विनायक राऊत यांनी राणेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे ते आता काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.