घोटभर पाण्यासाठी दिवसभर रांगेत थांबा, पण पाणी मिळेलच याची खात्री नाही;कातकरी पाड्यांची वणवण थांबता थांबेना
विरार पूर्व कातकरी पाडा परिसरात 10 ते 15 हजार लोकांची वस्ती आहे. या वस्तीत सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पालिकेची नळ योजना या वस्तीमध्ये घरोघरी नसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. रोजच्या पाणी वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने येथील नागरिका पाण्यासाठी प्रचंड त्रस्त आहेत.
विरार: विरारच्या कातकरी पाड्यामध्ये (Virar Katkari Pade) घोटभर पाण्यासाठी (Water Problem) लहान मुले, वयोवृद्ध महिला, पुरुषांना वणवण भटकावे लागत आहे. बिस्लरी किंवा प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी तासंतास रांगेत थांबावे लागत आहे. येथील पाण्याच्या समस्येविषयी महापालिकेला (Virar Corporation) वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. प्रशासनामुळेच कातकरी पाड्याच्या नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी दिवस दिवस घालावा लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी कडक उन्हाळ्यातही भटकंती करावी लागत असल्याने आम्ही जगावे की मारावे असा सवाल तेथील नागरिक उपस्थित करत आहेत.
मुलभूत सुविधांचा अभाव
विरार पूर्व कातकरी पाडा परिसरात 10 ते 15 हजार लोकांची वस्ती आहे. या वस्तीत सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पालिकेची नळ योजना या वस्तीमध्ये घरोघरी नसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. रोजच्या पाणी वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने येथील नागरिका पाण्यासाठी प्रचंड त्रस्त आहेत. त्यामुळे येथील परिसरातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी पाड्यावरील लोकांची होत आहे.
हंडाभर पाण्यासाठी दिवस दिवस जातो
वसई-विरार महापालिकेच्या सार्वजनिक नळासमोर बसून यांना हंडा, दोन हंड्यासाठी तासंतास ताटकळत बसावे लागत आहे. लहान मुलं असलेली आयाबायाही घागरभर पाण्यासाठी भटंकती करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने पाणी समस्या सोडवून नागरिकांना पाणी संकटातून मुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.
ना शासन ना प्रशासन
कातकरी पाडा वस्तीत गोर गरीब, कष्टकरी समाज राहत असल्याने त्यांचे हातावर पोट आहे. 4 ते 5 दिवसाला पाणी येते, त्यातही कमी दाबाने पाणी येते त्यामुळे कुणाला भेटत तर कुणाला भेटत नाही. पाणी मिळावे यासाठी येथील लहान लहान मूल, बाळांतीन, वयोवृद्ध महिला, आपला कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकत आहेत. पण या नागरिकांना कोणता लोकप्रतिनिधी अथवा महापालिका प्रशासन पाण्याची व्यवस्था करीत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. बहुजन समाज पार्टी च्या कार्यकर्त्यांनी अनेकवेळा वसई विरार महापालिकेला पाण्यासाठी तक्रारी केल्या पण दखल घेतली नसल्याचा आरोपही केल्या जात आहे.