शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू : विश्वास नांगरे पाटील
विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.
मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे, असं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare patil ) यांनी म्हटलं. (Vishwas Nangare patil Comment on Mumbai Farmer protest)
विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. “मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र राजभवनला जावं अशी त्यांची इच्छा आहे पण कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत नाही, आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत”, असं नांगरे पाटील म्हणाले.
“आम्ही शेतकरी नेत्यांशी चर्चा केलीय. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलाय तसंच आम्ही याच ठिकाणी मोर्चा स्थगित करायला सांगितला आहे. मात्र मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर जायला हरकत नाही. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जर राजभवनाच्या दिशेने जायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु, असंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.
“कोरोनाच्या काळात मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यासाठी एनजीओ, विविध संस्थानी मास्क पुरवले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काळजी घ्यावी”, असं नांगरे पाटील म्हणाले.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 800 पोलिस कर्मचारी-अधिकारी करण्यात आले आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, असा आमचा प्रयत्न असेल असं नांगरे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’….
अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत. कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे, ही देखील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
(Vishwas Nangare patil Comment on Mumbai Farmer protest)
हे ही वाचा :
LIVE | कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जातेय – फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!