सोमवार, मंगळवारी मुंबईतल्या काही भागात पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?
दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.ऐ
मुंबई : मुंबईकर (Bmc) आणि त्यांच्या पुरवठ्यासंबंधी (Water supply) ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. ही बातमी नीट वाचा अन्यथा तुम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतला पाणीपुरवठा (Water Cut) बंद राहणार आहे. महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम सोमवार 14 मार्चला सुरु होऊन ते मंगळवार दुपारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यास्तव, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे
जी/दक्षिण विभागः डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्गमध्ये सोमवारी दुपारी अडीच ते दुपारी साडीतीन वाजता डिलाई रोडला पाणीपुरवठा होणार नाही. दुसरीकडे जी/उत्तर विभागः संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभागातही सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही.
पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन
जी/दक्षिण विभागः ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार पामार्ग, महादेव पालव मार्गला मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच जी/दक्षिण विभागः धोबीघाट, सातरस्ता परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
Water Supply : पुढील आठवड्यात दोन दिवस मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद