मुंबई महापालिकेत पाणी कपातीवरुन खडाजंगी
विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईत 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी दोघेही आक्रमक झाले आहेत. एकीकडे, मुंबईला होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 27 टक्के इतकं पाणी हे पाणीचोरी आणि पाणीगळतीमध्ये जातं. तसंच पाणीकपातीचा निर्णय टँकर लॉबीला फायदा पोहचवण्यासाठीच घेतला गेला, असा आरोप विरोधकांनी केलाय. तर दुसरीकडे, लोकप्रतिनिधींना न विचारता […]
विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईत 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी दोघेही आक्रमक झाले आहेत. एकीकडे, मुंबईला होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 27 टक्के इतकं पाणी हे पाणीचोरी आणि पाणीगळतीमध्ये जातं. तसंच पाणीकपातीचा निर्णय टँकर लॉबीला फायदा पोहचवण्यासाठीच घेतला गेला, असा आरोप विरोधकांनी केलाय. तर दुसरीकडे, लोकप्रतिनिधींना न विचारता पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला, याचा जाब प्रशासनाला विचारला जाणार, असे सत्ताधारी म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत पाण्यावरुन युद्ध पेटल्याचे चित्र आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव यंदा कमी पाऊसमान झाल्यामुळं पूर्ण क्षमतेनं भरलेले नाहीत. त्यामुळेच मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका प्रशासन सांगत असले, तरी पाणीकपातीचे खरे कारण हे पाणीपुरवठा विभागाचे गैरव्यवस्थापन हेच आहे. ज्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो आहे.
सात तलावांमधून मुंबईला रोज 3800 दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यापैकी 27 टक्के म्हणजे सुमारे 1 हजार दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा पालिकेला मेळच लागत नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणातील पाण्याची चोरी आणि गळती होते. म्हणजेच पाणीचोरी आणि पाणीगळती रोखल्यास मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरंही जावं लागणार नाही. परंतु याबाबतीत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचेच समोर येते. सत्ताधारी शिवसेनाही ही जबाबदारी प्रशासनावर ढकलून मोकळी होत आहे.
टँकर लॉबीला फायदा करण्यासाठीच पाणीकपातीचा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसंच वचननाम्यात 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला पाणीकपातीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे.
मुंबई महापालिका प्रचंड पैसा खर्च करून सव्वाशे किलोमीटर अंतरावरुन पाणी मुंबईत आणते खरं, परंतु हे पाणी चोरी आणि गळतीमध्ये जात आहे. यावर महापालिका अनेक वर्षे काहीच उपाय योजना करत नाही. यामुळे भविष्यात पाऊस कमी झाला तर मुंबईत पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होईल, एवढे मात्र निश्चित.