मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची (Rajya Sabha election) खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या निवडणुकीत आम्ही राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केलं. राज्यसभेला आम्हाला पाठिंबा द्यावा, विधान परिषदेला आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव आघाडीने (mahavikas agahdi) आम्हाला दिला होता. पण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना उलटा प्रस्ताव दिला. तुम्हीच आम्हाला राज्यसभेला पाठिंबा द्या. आम्ही तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देऊ, असं आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. या संदर्भात आमचं केंद्राशी बोलणं झालं आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीनेही आमचीच भूमिका योग्य असल्याचं सांगितली. यू गो विथ दॅट स्टँड असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणारच, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्पष्ट केलं.
आघाडीचे नेते छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या पाचही नेत्यांमध्ये यावेळी राज्यसभेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधत भाजपची भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेच्या निवडणुकीत प्रचंड क्रॉस वोटिंग होते. हे आपण पाहिलं आहे. निवडणूक बिनविरोध होते ती तथ्यांच्या आधारे होते. त्यामुळे आम्हाला तीन जागा मिळाव्यात हा आमचा आग्रह आहे. विधान परिषदेच्या जागेत काही विचार करता येईल. यावेळी खूप चर्चा झाल्यानंतरही आघाडीच्या नेत्यांनी तोच तोच प्रस्ताव मांडला. राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा सोडू असं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. तर आमचा त्यांना उलटा प्रस्ताव होता, असं पाटील म्हणाले.
आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचा क्लेम लॉजिकच्या आधारे आहे. एकाच पक्षाचे 24 अधिक सहयोगींचे 6 अशी मते आमच्याकडे अतिरिक्त आहेत. विजयासाठी 41 मतांचा कोटा आहे. आम्हाला फक्त 11 ते 12 मते कमी पडत आहेत. आघाडीच्या मतांचा आकडा 30च्या पुढे जात नाही. आमच्या मागच्यावेळी तीन जागा होत्या त्या मिळाव्या हे लॉजिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही विधान परिषदेला पाचवी जागा लढणार नाही. राज्यसभेची जागा मागे घ्या, असं आम्ही आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केलं. तिसरी जागा लढणं आणि तिसरी जागा जिंकण्यात आम्ही खूप कॉन्फिडन्ट आहोत. त्यांनी प्रस्ताव मान्य केला नाही आमचा तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणारच, असं पाटील म्हणाले.
त्यांना जशी त्यांच्या आघाडीची काळजी आहे. तशी आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमच्या उमेदवाराला पार्टीचा एबी फॉर्म दिला आहे. तिसरा उमेदवार मागे घेणं आमच्या लेव्हलाल शक्यच नाही. याबाबत आम्ही श्रेष्ठींच्या कानावर आमचं मत घातलं. ते म्हणाले तुमची भूमिका योग्य आहे. यू गो विथ दॅट स्टँड, असंही ते म्हणाले.