आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हणत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही अजित पवार सोबत आल्यावर देखील बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हटलं. तुम्ही काँग्रेस सोबत सत्तेत जाताच बाळासाहेबांना जनाब म्हणू लागले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. टीव्ही ९ च्या सत्ता संमेलन या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, अजित पवारसोबत आल्यानंतर आम्ही लोकं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हणत. ते शरद पवारांच्यासोबत गेल्यावर ते हिंदू म्हणायचं विसरले. जनाब बाळासाहेब म्हणायला लागले. ऊर्दूत कॅलेंडर छापलं. बाकी सोडा, सर्व चालेल पण त्यांच्या कँपेनमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले. आमच्या इथे नाही दिसले. कोणी कुणासोबत गेले तरी कोण कुणाच्या रंगात रंगतं हे महत्त्वाचं आहे. अजित पवार आमच्या रंगात रंगले आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या रंगात रंगले आहेत. अशी टीका त्यांनी केली.
अधिकाऱ्यांवर कारवाई झाली
‘जो स्कॅम आम्ही काढला होता. त्यात २३ एफआयआर दाखल झाले. अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काही आत गेले. काही निलंबित आहे. त्यावेळी अजित पवारांवर आम्ही आरोप केले होते. कारण ते मंत्री होते. ते चुकीचं नव्हतं. मंत्र्याचीही जबाबदारी असतेच. आता ११ ते १२ वर्ष झाले. संपूर्ण चौकशी झाली. ज्यांच्यावर कारवाई व्हायची त्यांच्यावर कारवाई झाली. अडीच वर्ष ते दादांसोबत होते. ते दूर गेले आणि आता ते नाराज झाले आहेत.’
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गुन्हे वाढले
‘कोणतीही घटना घडली तर ती सीरिअस आहे. अशा घटना घडू नये ही राज्याची जबाबदारी आहे. घटना घडल्यावर न्याय मिळाला पाहिजे. एनसीबीआरचा डेटा वाचण्याची एक पद्धत आहे. पर लाख लोकसंख्येच्या प्रमाणात किती गुन्हे झाले ते पाहिले जाते. महाराष्ट्र लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या गोव्याशी तुलना करता येत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोव्हिडच्या काळात गुन्हे वाढले. पोक्सोचे गुन्हे अधिक वाढले होते. कुणाच्या सरकारमध्ये किती गुन्हे वाढले हा प्रश्न नाही. गुन्हे घडल्यानंतर आरोपीला किती पकडले, गुन्हे कमी करण्यासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. मी कोणत्याही आकड्याला घेऊन तुलना करत नाही.’
‘शाळेत अनेक विनयभंगांची प्रकरणे घडत आहे. काही शाळेत शिक्षकांच्या तर काही शाळेत स्टाफच्या माध्यमातून हे प्रकार होत आहे. विद्यार्थ्यांनी बोलावं म्हणून आम्ही एक व्यवस्था केली आहे. शाळेत महिला पोलीस जातात मुलांशी संवाद साधतात. घटना घडू नये. पण घटना घडल्यानंतर त्या दाबल्या तर ते खराब आहे. अशा घटना आल्यावर त्यावर कारवाई झाली पाहिजे.’