लोकसभा निवडणुकीवरून मोठी घोषणा; प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीला टेन्शन देणारं विधान
उद्या आदित्य ठाकरे ठाण्यातून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून लढत असले तरी मी युती धर्म म्हणून आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला जाणार. माझी पॉलिटिकल क्लॅरिटी आहे, असं आंबेडकर म्हणाले.
अक्षय कुडकेलवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला अजूनही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत घेण्यात आलेलं नाही. लोकसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असतानाही वंचितला सोबत घेतलं जात नाहीये. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट महाविकास आघाडीलाच टेन्शन देणारं विधान केलं आहे. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवरून मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला टेन्शन देणारं विधान केलं आहे. लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशी परिस्थिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये. महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचितच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. मात्र, काहीच होत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच बीड आणि सटाणा येथे सभा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
राष्ट्रवादीकडून आडकाठी
उद्धव ठाकरे आणि आमचा एकमेकांवर भरोसा आहे. काँग्रेसवाले जागा वाटपाची चर्चा करत नाहीत. राष्ट्रवादीकडून आडकाठी केली जात आहे. एकत्रित फॉर्म्युला ठरवण्यासाठी वेळ पाहिजे. पण ते वेळ घेत नाहीत. एकत्र येत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.
अकोल्यातून लढणार
आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. महाविकास आघाडीशी आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत. पण म्हणून आम्ही आमची तयारी करू नये असं होत नाही, असं सांगतानाच यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे
राहुल गांधी मोठ्या ताकदीनं अदानी विरोधात आहेत. मात्र शरद पवार अदानींना भेटतात. पवार अदानींच्या बाजूने आहेत. त्यामुळे तुम्ही अदानी विरोधात आहात की अदानींच्या बाजूने आहात हे राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचं असेल तर 272 खासदार निवडून आणावे लागतील. तेवढे खासदार आले नाही तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत. पुढील सरकार कोणाचं असेल हे सांगता येत नाही. कारण त्यावेळच्या फेस व्हॅल्यूवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपचे प्लानिंग घातक
2024च्या निवडणुकीत क्लिअॅरिटी पाहिजे. काँग्रेसमध्ये ती दिसत नाही. नरेटीव्ह काय आहे? मोदी आणि आरएसएस आहे काय? ते इंडिया आघाडीने ठरवलेलं नाही. इंडिया आघाडीतून वर्चस्ववादी राजकारण होणार नाही असं वाटतं. इंडिया आघाडी किंवा मविआत फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही. त्यामुळे दाल में कुछ काला है असं वाटतं. संघ आणि भाजपचे पुढच्या पाच वर्षासाठीचे प्लानिंग सुरू झाले आहेत. ते देशासाठी घातक आहे.