शिवरायांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र या; संजय राऊत यांचं संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना आवाहन
आसामचे मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसचे आहेत. ते पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदेंनीही तेच केलं. त्यामुळे दोन पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं जुळलं असेल.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जात आहे. भाजपकडून त्यांची वारंवार विटंबना केली जात आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही या अवमाना विरोधात एकत्र यावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.
छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. त्यामुळे या सर्वांविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले असतील महाविकास आघाडी असेल वा संभाजी ब्रिगेड असेल, ज्यांना ज्यांना महाराजांवर श्रद्धा आहे. ज्यांना ज्यांना महाजांचा स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावं. महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने एकत्र यावं. महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत आसाम भवनसाठी जागा मागण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात सर्वांना जागा हवी आहे. पण महाराष्ट्राला कोण जागा देणार आहे का? गुजरात उद्योगधंदे पळवत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहेत. राज्यातील सरकारला देशात खोके सरकार म्हणून मान्यता मिळाली आहे. खोके सरकारचं आणि आसामचं काय? असा सवाल त्यांनी केला.
आसामचे मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसचे आहेत. ते पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदेंनीही तेच केलं. त्यामुळे दोन पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं जुळलं असेल, असा चिमटा काढतानाच नवी मुंबईत आसाम भवन आहे.
त्यामुळे मुंबईत आसाम भवनसाठी जागा नाही. मात्र,सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. या भवनासाठी जागा द्यायची की नाही शेवटी हा निर्णय राज्याने घ्यायचा असतो, असंही ते म्हणाले.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कामाख्या देवीच्या दर्शनाला बोलावलं नाही. कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवी न्याय देवता आहे. त्या 40 आमदारांचाही न्याय करतील. आम्हाला खात्री आहे कामाख्या देवी न्याय करतील, असा घणाघातही त्यांनी केला.