मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी त्या मुंबईत आल्या आहेत. पण ममता बॅनर्जी या बैठकीला हजर राहण्याआधी मुंबईत आल्यानंतर सर्वात आधी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानी गेल्या. त्यांनी बच्चन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. तसेच त्यांच्यात काही वेळ गप्पा देखील झाल्या. बच्चन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“बच्चन कुटुंबिय हे खूप चांगले आहेत. अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवायला हवं. केंद्र सरकार अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार देणार नाहीत तर आम्ही जनतेकडून हा पुरस्कार देतो. अमिताभ बच्चन यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या कुटुंबाचा खूप योगदान आहे. आम्ही त्यांना जनतेकडून भारतरत्न पुरस्कार देऊ”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“आमच्या इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो. या महोत्सवला शाहरुख खान, सलमान खान, महेश भट, अनिल कपूर येतात. आम्ही अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. तसेच “मी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. आम्ही बहिणीलादेखील राखी बांधतो. कारण स्त्री-पुरुष समानता आहे. स्त्री आणि पुरुषात कोणताही भेट नाही. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.
“इंडिया आघाडीत आम्ही सर्व समान आहोत. आम्ही देशाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आघाडीचं नेतृत्व कोण करेल हा दुसरा मुद्दा आहे. आधी देशाला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दराबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका केली.
“गॅस सिलेंडरचे भाव किती वाढवले आहेत. आधी खूप वाढवायचे, नंतर निवडणुकीच्या वेळेला काहीसे कमी करायचे. गॅस सिलेंडरचा दर 800 किंवा 900 रुपये असला तरी कसं चालेल? आपल्या देशात अनेक गरीब कुटुंब आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
अमिताभ बच्चन यांना बंगालचे जावई म्हणूनही ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जया बच्चन यांनी फार पूर्वीच ममता बॅनर्जी यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ममता बॅनर्जी यांना आज मुंबईत येण्याची संधी मिळताच त्यांनी विमानतळावरून थेट अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ येथील घरी भेट दिली.