Nitin Desai | नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी काय-काय केलं? स्टुडिओतली एक-एक घटना महत्त्वाची

| Updated on: Aug 03, 2023 | 10:32 PM

नितीन देसाई यांच्या संबंधी महत्त्वाची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. नितीन देसाई यांच्या 11 ऑडिओक्लिप पैकी पहिल्या क्लिपची सुरुवात 'लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार', अशी आहे. तर ऑडिओ क्लिपचा शेवट हा 'पाऊले चालती पंढरीची वाट' असा आहे.

Nitin Desai | नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी काय-काय केलं? स्टुडिओतली एक-एक घटना महत्त्वाची
नितीन देसाई
Follow us on

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करुन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याआधी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. या ऑडिओ क्लिप पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये देसाई यांनी राज्य सरकारकडे एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्याची देखभाल करावी, अशी विनंती केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी ज्या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं त्यावर आक्षेप नोंदवल्याची माहिती मिळत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आत्महत्येच्या रात्री काय घडलं?

नितीन देसाई मंगळवारी रात्री 12 वाजता बाहेरगावातून मुंबईत आले होते. ते रात्री 2 वाजेच्या सुमारास कर्जतमधील एनडी स्टुडिओत गेले. आत्महत्येसाठी वापरलेली दोरी महिन्याभरापूर्वीच रंगमंचावर होती. देसाई यांनी आत्महत्येपूर्वी दोरीच्या सहाय्यानं धनुष्यबाणाची प्रतिकृती बनवली.

नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची संख्या 11 आहे. त्यांनी व्हॉईस रेकॉर्ड हे आधीपासूनच टप्प्याटप्प्याने केले आहेत. ऑडिओ रेकॉर्डमध्ये जीवनप्रवास आणि एनडी स्टुडिओची जडणघडण मांडलीय. तसेच त्यांनी यामध्ये कर्ज घेतलेल्या एडलवाईज कंपनीवर अनेक आक्षेप नोंदवले आहेत.

पहिल्या ऑडिओ क्लिपची सुरुवात ‘लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार’, अशी आहे. ऑडिओ क्लिपचा शेवट ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असा आहे. “संकटांना तोंड देत मी एनडी स्टुडिओचं शिवधनुष्य उचललं”, असा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. “आजवर मी हे शिवधनुष्य पेललं, मात्र आता ते कठीण जातंय”, असाही उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

नितीन देसाईंनी गळफास घेतला त्याच्याखाली धनुष्यबाणाची प्रतिकृती बनवण्यात आली होती. धनुष्यबाणाचं टोक असलेल्या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘नितीन देसाई प्रकरणी कायदेशीर बाबी तपासू’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली होती. त्याच दृष्टीने तपास करु, असं गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासू, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव होता का? याची चौकशी करणार, असं फडणवीस म्हणाले.

“जाणीवपूर्वक, वेगळ्या पद्धतीने एआरसीच्या माध्यमातून त्यांचा स्टुडिओ कब्ज्यात घेण्याकरता काही वेगळ्या प्रकारे दबाव बनवण्यात आला का? काही वेगळ्या प्रकारे जोरजबदरस्ती करण्यात आली का? नियमाच्या बाहेर जावून त्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला का? याची चौकशी निश्चितपणे सरकार करेल. एनडी स्टुडिओ टेक ओव्हर करता येईल का? किंवा त्यात जे काही करता येईल त्यासंदर्भात कायदेशीर बाब तपासली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस आज सभागृहात म्हणाले.