Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | फुटलेल्या पक्षांमध्ये पुन्हा फूट पडणार? दाव्यामागील राजकीय गणितं काय?
फुटलेल्या अजित पवारांच्या गटात अजून एक फूट पडण्याचा मोठा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ नेते अजित पवारांच्या गटातून फुटीचं भाकीत लोंढेंनी वर्तवलंय.
मुंबई | 12 मार्च 2024 : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. लोंढेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “धोके पे धोका…. ऐसा कोई सगा नहीं, जिसे भाजपाने ठगा नहीं. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात आदिती तटकरे, सुनील शेळकेंसह १२ बडे नेते आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. उरलेले आमदार शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत परत जाणार’. मात्र अतुल लोढेंच्या या दाव्याला आधार काय? या दाव्यामागे कोणत्या गणितांची चर्चा सुरु आहे? ते समजून घेऊयात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 41 आमदार, 18 खासदार आहेत. ठाकरेंकडे 15 आमदार आणि 5 खासदार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 1 खासदार आणि जवळपास 42 आमदार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 11 आमदार आणि 3 खासदार. मात्र जागावाटपात भाजप शिंदेंच्या शिवसेनेला २०१९ ला जिंकून आलेल्या १८ जागा सोडण्याची शक्यता जवळपास नाहीत जमा आहे. याउलट मविआत ठाकरेंच्या शिवसेनेला किमान १८ जागा मिळण्याचा मार्ग सोपा आहे.
हा मुद्दा प्रचारात मोठा ठरु शकतो
अजितदादांना सुद्धा भाजपकडून ४ हून जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ८ ते १० किंवा त्याहून जास्त जागा लढवण्याची तयारी करतंय. चर्चा या होतायत की आम्हीच खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी असू तर भाजप तितक्या जागा का सोडत नाही? हा मुद्दा प्रचारात मोठा ठरु शकतो. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यावरुन भाजपसह शिंदे-अजितदादांना घेरु शकते.
आमदारांच्या डोक्यात विधानसभेच्या गणितांचं कोडं
सध्या निवडणूक लोकसभेची असली तरी विविध आमदारांच्या डोक्यात विधानसभेच्या गणितांचं कोडं पडलंय. कारण लोकसभेच्या 48 जागांसाठी अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन जागा कमी होऊ शकतात. तर मग 288 जागांवर आमदारांचीही तिकीटे नाकारली जाणार का? ही भीती शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत्या अनेक आमदारांना सतावतेय.
महायुतीत जागावाटपाबाबत काय-काय घडलं?
आता महायुतीच्या बैठका कशा झाल्या? त्यात सूत्रांच्या माहितीनुसार काय ठरलं? हे देखील जाणून घेऊयात. 5 मार्चला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली. शिंदे-फडणवीस-अजित पवारांसोबत 1 तास चर्चा झाली. या बैठकीत शाहांनी जिथून ज्यांचा उमेदवार आहे, त्यांना ती जागा मिळणारच याचा आग्रह न धरण्याची सूचना शाहांनी केली. त्याऐवजी जो जिंकून येवू शकतो, त्याला संधी द्या, असं शाहांनी सांगितलं.
यानंतर सह्याद्रीवरच अमित शाहा-शिंदे या दोघांमध्येच अर्धा तास बैठक झाली, पण गुंता सुटला नाही. 8 मार्चला शिंदे-फडणवीस-अजितदादा दिल्लीला गेले. अमित शाहांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. सूत्रांनुसार या बैठकीत शिंदे-अजितदादांनी विद्यमान खासदारांहून जास्तीच्या जागांचा आग्रह धरला. कमी जागा लढण्यास कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील, असंही दोघांनी सांगितलं. मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही. नंतर शाह आणि फडणवीस दोघांमध्ये स्वतंत्र बैठक झाली.
यानंतर 11 मार्चला पुन्हा दिल्लीत जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. मात्र ११ तारखेची बैठक रद्द झाली. आता पुढच्या एक ते दोन दिवसात बैठक होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. चर्चेनुसार पहिल्यांदा केलेल्या आकड्यांची मागणी मागे पडून आता महायुतीत जागांचं सन्मानजनक वाटप व्हावं, यावर बैठकीचा फोकस असणार आहे.