तीनचा आकडा… अशोक चव्हाण आणि अजित पवार… साम्य काय?; पृथ्वीराज चव्हाण यांनी काय सांगितलं?

| Updated on: Feb 13, 2024 | 7:33 PM

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये प्रचंड जल्लोष करण्यात आला आहे. चव्हाण समर्थकांनी नांदेडमध्ये बॅनर्स लावून चव्हाण यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. साहेब, आण्ही सदैव तुमच्यासोबत... असं या बॅनर्सवर लिहिण्यात आलं आहे. नांदेडच्या माजी महापौर मोहिनी येवणकर आणि त्यांचे पती विजय येवनकर यांनी हे बॅनर्स लावून नांदेडकर चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे.

तीनचा आकडा... अशोक चव्हाण आणि अजित पवार... साम्य काय?; पृथ्वीराज चव्हाण यांनी काय सांगितलं?
ashok chavan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी मोठा निर्णय घेऊन काँग्रेसला धक्का दिला आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पक्षात काहीच बदल होत नव्हता. मनमानी सुरू होती, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र, चव्हाण काँग्रेस सोडून जाण्याची वेगळीच कारणे सांगितली जात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्ष सोडण्यातील साम्यच दाखवलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्या पक्ष सोडण्यातील एक साम्य सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळला होते. त्यावेळी त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर तीनच दिवसांनी अजित पवार यांनी पक्षांतर केलं. केंद्र सरकारनेही तीन दिवसांपूर्वी श्वेतपत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळ्याचं नाव आल्याबरोबर तीन दिवसातच अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. दोन्ही नेत्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उजेडात येताच तीन दिवसातच त्यांनी पक्ष सोडला. तीन दिवसाचं साम्य या दोन्ही नेत्यांमध्ये असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

चव्हाणांवर दबाव होता

काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते. काँग्रेस अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांना ते भेटले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आहे, असं नेतृत्वाला सांगितलं होतं. चौकशी संस्था, एजन्सींचा दबाव आहे, असं त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. पण कोणती केस होती? कोणता दबाव होता हे माहीत नाही. पण दबाव आहे असं ते म्हणाले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

साहेब, सदैव तुमच्यापाठी

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये एकच जल्लोष करण्यात आला आहे. साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत… असा मजकूर लिहिलेले बॅनर्ज नांदेडमध्ये लावण्यात आली आहेत. नांदेडच्या माजी महापौर मोहिनी येवणकर आणि त्यांचे पती विजय येवनकर यांनी हे बॅनर्स लावून नांदेडकर चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय. चव्हाण यांच्या प्रवेशानंतर आता त्यांचे समर्थक पदाधिकारीही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.