मुंबई : अदानी समुहावरच्या गैरव्यवहारांच्या आरोपांवर विरोधकांनी बोट ठेवायला सुरुवात केलीय. भाजप नेते त्यावर का बोलत नाहीत? असा प्रश्न ठाकरे गटाचे संजय राऊतांनी (Sanjay Raut) विचारलाय. दुसरीकडे अदानी समुहात एलआयसी (LIC) आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) केलेल्या गुंतवणुकीचं काय झालं? याबद्दल चर्चा सुरु झालीय. त्यावर या दोन्ही संस्थांनी काय स्पष्टीकरण दिलंय. एका रिपोर्टनं अदानींच्या साम्राज्याला धक्का बसल्यानंतर आता राजकीय वर्तुळही ढवळून निघतंय. अदानी समुहावरच्या आरोपांवर भाजप नेते गप्प का? एलआयसीचे किती पैसे बुडाले? किरीट सोमय्या अदानींवर कधी बोलणार? असे प्रश्न संजय राऊतांनी केले आहेत. भाजपनं मुंबईतल्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावरुन ठाकरे गटावर आरोप केले होते. त्याच प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊतांनी अदानी समुहावरुन भाजपला सवाल केले. अदानी समुहावर नेमके काय आणि कशाच्या आधारावर आरोप झाले? आणि त्यावर अदानी समुहानं काय म्हटलंय ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
हिंडेनबर्ग या अमेरिकेतल्या कंपनीनं एक रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये अदानी समुहानं शेअर बाजार हाताळून स्वतःच्या संपत्ती फुगवल्याचा दावा आहे.
हा रिपोर्ट आल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले. श्रीमंताच्या यादीतून अदानींचा नंबर तिसऱ्या स्थानावरुन थेट 11 व्या स्थानी पोहोचलाय.
दरम्यान हे सारे आरोप खोटे असून हिंडेनबर्गचा रिपोर्ट अर्धवट आणि खोट्या माहितीवर आधारित असल्याचा दावा अदानी समुहानं केलाय.
काल अदानी समुहानं हिंडेनबर्गच्या आरोपांवर 413 पानांचं उत्तर दिलंय. ज्यात अहवालातले दावे खोटे ठरवत हिंडेनबर्ग कंपनीनं हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. यामागे अमेरिकेतल्या कंपन्यांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचं गणित असल्याचा दावा केलाय.
त्यावर उत्तर देताना हिंडेनबर्गनं म्हटलंय की भारत एक लोकशाही आणि आगामी महासत्ता देश आहे. पण देशाची लूट करणाऱ्या अदानी समुहानं तिरंग्याखाली भारताचं भविष्य रोखलंय. ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं केलं असलं तरी फसवणूक ही फसवणूकच आहे.
अदानी समुहात देशातली सर्वात मोठी विमान कंपनी एलआयसी आणि देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं मोठी गुंतवणूक केलीय. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी ज्या सामान्य लोकांनी पैसे गुंतवले होते, त्यांचंही नुकसान झाल्याचं बोललं जातंय.
अदानींचे शेअर कोसळल्यानंतर एकट्या एलआयसीलाच सुमारे 16 हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा करण्यात आलाय. यावर एसआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं काय स्पष्टीकरण दिलंय? हे पाहण्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि संजय राऊतांनी काय म्हटलंय? ते देखील महत्त्वाचं आहे.
दरम्यान, एलआयसीनं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, अदानींच्या कंपन्यांमध्ये एलआयसीनं एकूण 30 हजार 127 कोटींची गुंतवणूक केलीय.
जर अदानींच्या शेअर किमतीप्रमाणे त्यांची आजही विक्री केली तर ती रक्कम 56 हजार 142 कोटी होईल. म्हणजे एलआयसीनं गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा 26 हजार 16 कोटी हा नफाच असेल. असं एलआयसीनं म्हटलंय.
स्टेट बँक ऑफ इंडियानं म्हटलंय की, अदानी समुहाला आम्ही दिलेलं कर्ज हे नियमाप्रमाणेच आहे. दिलेल्या कर्जाला कोणताही धोका नाही. जर आम्ही दिलेल्या कर्जाला धोका होत असेल तर त्याचा आढावा घेण्याची पद्धती आहे. या प्रकरणातही आमचं लक्ष आहे, असं एसबीआयनं सांगितलंय.