जेलमधून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे फोनवर काय म्हणाले? संजय राऊत म्हणतात…
संजय राऊत यांची जेलमधून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची आज अखेर 102 दिवसांनी जेलमधून जामिनावर सूटका झालीय. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राऊत त्यांच्या जामिनाची वाट पाहत होते. अखेर त्यांना आज जामीन मिळाला. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेत एक वेगळं चैतन्य संचारलं आहे. या दरम्यान जामीन मिळाल्यानंतर त्यांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं. तसेच ठाकरेंसोबत आणखी काय बातचित झाली, याबाबतची त्यांनी माहिती दिली.
“उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली. तेही माझा आवाज ऐकण्याची वाट पाहत होते. त्यांचाही घसा भरुन आला होता”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“जामिनाच्या निकालानंतर माझा न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायव्यवस्था, घटना, कायदा जीवंत आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी जेलमध्ये असताना आपल्या आईला पत्र पाठवलं होतं. राऊत जेलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या आईंना रडू आलं होतं. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला अटक झाली तेव्हा माझ्या आईप्रमाणेच महाराष्ट्रातल्या अनेक आया अशा आहेत ज्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी जेलमधून बाहेर पडल्यानंतर आधी कुठे जाणार याबाबत माहिती दिली. “सुनील राऊत माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी देवळात जातोय. त्यानंतर मी कदाचित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटेन. नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रथम जाणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “सोडून जाऊद्या. त्यांना आज एवढं प्रेम बघून, माझं स्वागत बघून त्यांना आपण चूक केली असं वाटलं असेल “, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.