अन् वाटलं आता सर्व संपलं, आता थांबावं… ‘त्या’ व्हिडीओनंतर गौतमी पाटील अक्षरश: हादरली; काय होता थरारक प्रसंग?
मी गरीब घरातील आहे म्हणून टीका होते का? मला कुणाचा पाठिंबा नाही. माझ्या मागे कुणाचा हात नाही म्हणून टीका होते का? असा विचार मनात येतो. माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागितली. त्यानंतर चुका टाळल्या. घुंगराशिवाय नाचत नाही. तरीही टीका का? असा सवाल गौतमी पाटील हिने केलाय.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : सबसे कातिल गौतमी पाटील अशी तिची ओळख झाली. एक एक करत ती यशाची शिखरं पादाक्रांत करत गेली. तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हीच तिची खरी संपत्ती आहे. या संपत्तीच्या जीवावरच तिला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. मानसन्मान मिळाला. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. अशावेळी एक प्रसंग तिच्या बाबतीत घडला अन् तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मनात विचार आला, आता सर्व काही संपलं. आता थांबावं… असं काय घडलं गौतमीच्या आयुष्यात? लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि पैसा पायाजवळ लोळण घेत असताना तिच्या मनात असा विचार कसा चमकून गेला?
गौतमी पाटील हिचा मध्यंतरी एक व्हिडीओ व्हायरल झाला. कुणी तरी चोरून हा व्हिडीओ काढला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जेव्हा गौतमी पाटील हिला या व्हिडीओची माहिती मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलं आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. लोक काय म्हणतील? लोकांना कसं सामोरे जायचं असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला.
गौतमी इतकी घाबरली की आता सर्व संपलंय. आता थांबलं पाहिजे, असा निर्णयच तिने मनाशी पक्का केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौतमीने हा थरारक प्रसंग सांगितला. गौतमी हा थरारक प्रसंग सांगत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणूकाही कालच हा प्रसंग घडावा असं वाटावं इतकी ती रडत होती. अन् अंगावर रोमांच उभे राहत होते.
मैत्रिणींपर्यंत व्हिडीओ आला, पण…
माझा व्हीडीओ व्हायरल झाला. तेव्हाच वाटलं आता थांबावं, हे सर्व सोडावं. हा प्रकार घडला. तो व्हिडीओ व्हायरल झाला हे मला मी घरात असताना कळलं. हा प्रकार माहीत पडताच आम्ही सर्व घाबरलो. माझ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडीओ आधीच आला होता. पण मला सांगावं कसं? असा प्रश्न त्यांनाही प्रश्न पडला होता. मला कळल्यावर मनात विचार आला. सर्व संपलं. आता काही नकोच, असं गौतमी पाटील म्हणाली.
मनाशीच निर्णय घेतला
लोकांना प्रगती पाहवत नाही म्हणून लोक असं करतात का? एवढ्या थरापर्यंत जातात का? असा सवाल मनात आला. त्यामुळे मी हे क्षेत्र सोडण्याचा मनाशीच निर्णय घेतला. पण मला अनेकांनी समजावलं. तुझ्या विरोधकांना तेच हवं आहे. तू थांबलं पाहिजे हेच त्यांना वाटतं. त्यांना जे पाहिजे तेच घडणार असेल तर मग तू का थांबते? असं मला समजावल्या गेलं, असं गौतमीने सांगितलं.
सर्वच सारखे नसतात
या प्रकरणानंतर बरेच दिवस गॅप झाला. त्यानंतर मी नव्याने पुन्हा सुरुवात केली. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच कार्यक्रम करताना मी खूप घाबरले होते. समोरून रिस्पॉन्स कसा येतो? स्टेजवर गेल्यावर लोक काय म्हणतील? हा प्रश्न मनात आला. पण लोकांनी मला सावरलं. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असा काही प्रकार घडलाय हे मला प्रेक्षकांनी तसूभरही भासू दिलं नाही.
काही तरी झालं याची जाणीव होऊ दिली नाही. प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणेच मला साथ दिली. त्यामुळे मी पुन्हा उभी राहिले. सर्वच सारखे नसतात. काही लोक चांगले असतात हेही दिसून आलं. त्या प्रसंगात मला महिलांनीही प्रचंड साथ दिली, असं सांगताना गौतमीला अश्रू अनावर झाले.
स्वप्न नाहीत, भविष्याचा विचार नाही
तू भविष्यात काही करायचा विचार केलाय का? तुझी भविष्यातील स्वप्न काय आहेत? पुढच्या पाच दहा वर्षात तू स्वत:ला कुठे पाहतेस? असा सवाल गौतमीला करण्यात आला. त्यावर तिने अगदी मनमोकळेपणानं उत्तर दिलं. मी भविष्याचा काहीच विचार केला नाही. मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझं काहीच स्वप्न नव्हतं.
या फिल्डमध्ये आले तेव्हाही स्वप्न नव्हतं. घर कसं चालणार याचाच विचार होताय़ पुढे काय होईल याचा कधीच विचार केला नाही. आला महिना कसा जाईल याचाच विचार होता. आजही तोच विचार असतो. फक्त कार्यक्रम करण्यावर माझा भर असतो. सिनेमातून ऑफर आली तर तेही करेल, असं तिने सांगितलं.